Home » ब्रेकिंग न्यूज » बीडच्या महिला डॉक्टरांचे महाश्रमदान..

बीडच्या महिला डॉक्टरांचे महाश्रमदान..

बीडच्या महिला डॉक्टरांचे महाश्रमदान..

वार्ताहर – डॉ.अनिल बारकुल

बीड – आरोग्य जनजागृती, महिला विकास, गर्भलिंग निदान विरोधी चळवळ, वृक्ष लागवड व संवर्धन, सुरक्षित मातृत्व योजना, Walk for Her रॅली, गर्भाशय वाचवा अशा विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहीलेल्या आय.एम.ए.बीडच्या महिला डाॅक्टरांनी आज दि.०८/०५/२०१९ रोजी घाटसावळी येथे पाणी फाउंडेशन तर्फे आयोजित वाॅटर कप स्पर्धेत सहभागी होऊन गावच्या महिला सरपंच व गावक-यांसह महाश्रमदान केले.
एरव्ही नाजूक हाताने रुग्णाची नस पकडणा-या हातात आज टिकाव खोरे अन् टोपली धरलेली दिसत होती. सध्याच्या पाण्याच्या गंभीर टंचाईमुळे अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना मदतीचा हात देण्यासाठी आलेल्या या डाॅक्टरांना त्यांच्या कष्टाची जाणीव पदोपदी होत होती. याप्रसंगी सिनियर महिला डाॅक्टरांच्या डोळ्यात औत्सुक्य तर तरुण महिला डाॅक्टरांच्या नजरेत प्रचंड उत्साह जाणवत होता.

टिकावाचे चार घाव घातल्यावर या कामात आपला टिकाव लागणार नाही हे समजत होते तरी पण शेताच्या चारी दिशेला चारी खांदण्याचे काम डाॅक्टर आनंदात करत होते. कुदळीने जमीन खांदून खो-याने माती टोपलीत ओढून भरणे हे काम डाॅक्टरांसाठी अतिशय जिकिरीचे होते. पाच सहा वेळा खाली वाकून जमिन खांदून परत टोपले उचलले की पाठीत सनक येत होती यावरुन शेतकरी किती शारिरीक कष्ट करत असावेत याची जाणीव डाॅक्टरांना होत होती. एसी केबिनमध्ये बसून पेशंट तपासणा-यांच्या कपाळावरुन घामाच्या धारा वाहत होत्या. पेशंटचे ब्लड प्रेशर बघून बघून घट्टे पडलेल्या हातावरही अर्ध्या तासातच टिकाव कुदळ धरून फोड आले होते. एक मातीचे टोपले किती वजनदार असते याचा अनुभव बरेच जणांनी आयुष्यात पहिल्यांदाच घेतला.
दीड दोन तास श्रम करुन थकलेले डाक्टर्स ही उन्हातली कामे शेतकरी बांधव व शेतकरी माय माऊली सलग आठ आठ तास आणि वर्षाचे बारा महिने कसे करत असतील या विचारात गढून गेले होते. उन्हा तान्हात राबताना राकट झालेले हात डाॅक्टर दवाखान्यात नव्हे तर प्रत्यक्ष शेतावर पाहत होते. तीन फूट रुंद व दोन फूट खोल अन् दोनशे फूट लांब चर शेताच्या बांधावर खोदताना समाजसेवा केल्याचा आनंद या डाॅक्टरांच्या चेह-यांवर दिसून येत होता.

दिवसभर एवढे काबाडकष्ट करुन मिळवलेले दोनशे रुपये जेव्हा शेतक-याकडून पाच मिनिटाच्या कन्सल्टेशनसाठी हे डाॅक्टर घेतील तेव्हा त्यांच्या हात त्या कष्टाच्या,वेदनांच्या जाणिवेने थरथरल्याशिवाय राहणार नाही असा थरारक अनुभव होता तो डाॅक्टरांसाठी!
काम आटोपल्यावर लिंबाच्या गार सावलीत बसून थंडगार वा-याची झुळूक अंगावर घेताना दवाखान्यातला एसी निसर्गापूढे केवढा फिका आहे याची अनुभूती घेत डाॅक्टरांनी ग्रामसभेसाठी शेतात मांड ठोकली होती.
ग्रामसभेत वर्धा जिल्ह्यातील दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले श्री बंडू धोत्रे यांचे पाण्याच्या चळवळीसंबंधात भाषण झाले. यात त्यांनी या पाणी फाऊंडेशनच्या श्रमदान चळवळीचे महत्व सांगितले तसेच अतिशय गोड आवाजात श्रमदानाचे महत्व सांगणारी गाणी गायली व अमिर खान यांच्या कार्याची माहिती दिली. हाच धागा पकडून बीड आय.एम.ए.चे अध्यक्ष डाॅ.अनिल बारकुल यांनी बंडू धोतरे यांच्या मार्फत अामिर खान यांना विनंती केली की काही थोडक्या वाईट प्रवृत्तीच्या डाॅक्टरांमुळे बहुतांश चांगल्या डाॅक्टरांची प्रतिमा जनसामान्यात त्याच्या सत्यमेव जयते या शो मधून डागाळली असून चांगल्या डाॅक्टरांची सकारात्मक बाजू मांडणारा चित्रपट तयार करुन डाॅक्टरांची प्रतिमा समाजात उंचावण्याचे काम करावे अशी विनंती केली व ही गोष्ट आमिरच्या कानावर घालण्याची आशा बंडू धोतरे यांनी व्यक्त केली.
आय.एम.ए.बीडच्या महिला विंगच्या अध्यक्षा डाॅ.प्रज्ञा डाके यांच्या नेतृत्वाखाली
सर्व महिला डाक्टर सौ राऊतमारे,सीमा जोशी, सारीका क्षीरसागर, ओस्तवाल, बारकुल, वाघ, शहाने,शिंदे, पांगरीकर,हुबेकर,धूत, हांडा,शहा,बहिर,लांडगे सह आय एम ए पदाधिकारी ओस्तवाल, गिते, योगे, शिंदे व इतर समस्त ग्रामवासीयांनी या महाश्रमदान यज्ञात सहभाग नोंदवला. आणी 10,000 रु ची मदत रोख रकमेच्या स्वरूपात दिली.
असा एक आगळावेगळा जिवंत अनुभव घेऊन सर्व डाॅक्टर मंडळी रुग्णांना आरोग्यसेवा प्रदान करण्यासाठी बीडच्या दिशेने झेपावली…….!!!!

Leave a Reply

Your email address will not be published.