Home » देश-विदेश » शहिद तौसिफच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

शहिद तौसिफच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

शहिद तौसिफच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

डोंगरचा राजा/आँनलाईन

बीड – पाटोदा – नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात गडचिरोली जिल्हयातील जांभूरखेडा येथे तौसिफ आरेफ शेख हे शहिद झाले. त्यांचे पार्थिव गुरुवारी मध्यरात्री त्यांचे मूळ गाव पाटोदा येथे आणण्यात आले होते.
शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर आज शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करुन दफन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, अतिरिक्त पोलीस अधिकारी विजय कबाडे, तहसिलदार रुपा चित्रक, निवृत्त कर्नल डोर्ले, कॅप्टन माळी यासह राजकीय, सामाजिक, शासकीय माध्यम क्षेत्रातील व्यक्ती आणि धर्मगुरु आदींनी पुष्पचक्र व पूष्प वाहून श्रध्दांजली अर्पण केली.
सशस्त्र पोलीस पथकाच्या वतीने बंदूकीच्या फैरी झाडून अखेरची मानवंदना देण्यात आली. शहिद तौसिफ यांचे पार्थिव सकाळी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी सकाळ पासून पाटोदा तालूका आणि जिल्हयाच्या विविध भागातून मोठ्या संख्येने नागरीक जमा होत होते.
सकाळी 9 वाजता त्यांच्या क्रांतीनगर मधील घरापासून अंत्ययात्रेस सुरवात झाली. डॉ. आंबेडकर चौक, राजमहंमद चौक, मांजरसुंबा रोडने ही अंत्ययात्रा गेली. शहराच्या मुख्य भागातून व रस्त्यावरुन दोन-तीन कि.मी. अंतर चाललेली अंत्ययात्रा पाटोदा-मांजरसुंबा रोडवरील ग्रामीण रुग्णालया समोरच्या शासकीय जागेवर पोहचल्यानंतर 11.15 वाजेनंतर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार आणि नंतर धार्मिक पध्दतीने दफनविधी झाले. 12.25 पर्यंत हे अंत्यविधी सुरु होते. यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन श्रध्दांजली वाहिली.
शहिदांचा गौरवशाली इतिहास व परंपरा सांगणारे पाटोदा
पाटोदा शहर व तालुका स्वातंत्र्य पूर्वकाळापासून मराठवाडामुक्ती संग्राम आणि स्वतंत्र भारताच्या वाटचालीत देखील शहिदांची जन्मभूमी ठरली आहे. शहिद तौसिफच्या घरापासून हाकेच्या अंतरावर शहिद स्मारक असून याच क्रांतीनगर भागातून यापूर्वी दोन जवानांनी देशासाठी बलिदान दिले आहे.
शहिद तौसिफच्या कुंटुंबियासह संपूर्ण पाटोदा शहर शोकाकूल
शहिद तौसिफ यांची पत्नी अंजुम तौसिफ,मुलं मोहम्मद जैद व तैमूर, वडील शेख आरेफ उस्मान, आई शमिम आरेफ, मोठा भाऊ आशिफ आरेफ, लहान भाऊ नाजिम आरेफ, दोन्ही भावांची पत्नी व मुलं असा परिवार या घटेनेने शोकसागरात बुडाला. सदर वृत्त कळाल्यापासून त्यांना धीर देण्यासाठी शहरातील सर्व थरातील नागरीक भेट देत होते. आज संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून व्यापारी, नागरीक,युवक,महिला प्रचंड मोठ्या संख्येने अंत्ययात्रेत सहभागी झाले.
*-*-*-*-*-*

Leave a Reply

Your email address will not be published.