अलविदा तौसिफ भैय्या..
अमोल जोशी / डोंगरचा राजा आँनलाईन
▪ शहीद जवान तौसिफ शेख यांना साश्रु नयनांनी अखेरचा निरोप
पाटोदा : ‘जब तक सुरज चांद रहेगा, तौसिफ भैय्या तुम्हारा नाम रहेगा’ अशा घोषणा देत नक्षली हल्ल्यातील शहीद जवान तौसिफ शेख यांच्या पार्थिवावर पाटोदा येथे शासकीय इतमामात दफनविधी करण्यात आला. यावेळी जिल्हाभरातून आलेले हजारो नागरिक पापाss पापाss म्हणत दीड वर्षीय जहेद याने वडिलांसाठी प्रचंड आक्रोश केला. तौसिफ यांची पत्नी सिबा, मोठा मुलगा मोहम्मद यांची अवस्था पाहून उपस्थित नागरिकांच्या डोळ्याच्या कडा आपोआप ओल्या झाल्या.
शहीद तौसिफ शेख यांची अंत्ययात्रेला सकाळी ९ वाजता त्यांच्या राहत्या घरापासून सुरुवात झाली. यावेळी पाटोदा शहरासह जिल्हा भरातून लोक सहभागी झाले होते. नक्षलवाद मुर्दाबाद..मुर्दाबादच्या घोषणा देत शहीद तौसिफच्या बलिदानाचा बदला घ्या, नक्षलवाद समूळ नष्ट करा, अशी मागणी करण्यात आली. अंत्ययात्रेत सर्व धर्मीय महिला-पुरुष सहभागी झाले होते. तौसिफ यांच्या क्रांतीनगर भागातील घरापासून सकाळी अंत्ययात्रा निघून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, राजमहंमद चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पुढे ग्रामीण रुग्णालय समोरील भूमी अभिलेख कार्यालय समोरील मांजरसुंबा रोडवरील शासकीय जागेवर अखेरचा निरोप देण्यात आला.
तौसिफ यांच्या निधनामुळे पाटोदा शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज पाटोदा बंद ठेवून दुखवटा पाळण्यात येत आहे. शहरातील व शेजारी सर्वजण तौसिफ यांच्या आठवणीने गहिवरले होते. उपस्थित नागरिकांनी शहीद तौसिफ यांच्या कुटुंबीयांचे सात्वंन करण्यात आले. यावेळी आमदार भीमराव धोंडे, आमदार सुरेश धस, जिल्हापरिषद अध्यक्षा सविता गोल्हर, माजी आमदार साहेबराव दरेकर, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांच्यासह हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थिती होते.
▪ पालकमंत्री, खासदार, विरोधी पक्षनेते गैरहजर :
जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून पाटोद्यात येत नागरिकांनी शहीद तौसिफ यांना अखेरचा निरोप दिला. मात्र, पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदारकीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. जिल्ह्यातील प्रमुख नेते गैरहजर अंत्यविधीसाठी राहिल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली.