Home » ब्रेकिंग न्यूज » आई, माझी काळजी करू नकोस..’

आई, माझी काळजी करू नकोस..’

आई, माझी काळजी करू नकोस..’

डोंगरचा राजा/आँनलाईन

▪ रमजानच्या सुटीला गावाकडे येण्यापूर्वीच तौसिफ यांना वीरमरण

पाटोदा : ‘आई, तू माझी काळजी करू नको. मी मजेत आहे. तू स्वत:च्या तब्येतीची काळजी घे’ हे शब्द आहेत शहीद शेख तौसिफ यांचे.. आज सकाळी त्यांचे आईसोबत फोनवरून झालेलं हे बोलणं अखेरचं ठरलं. त्यानंतर थोड्याच वेळात नक्षलींच्या भ्याड हल्ल्यात ते शहीद झाले. पुढील आठवड्यात रमजानसाठी ते सुट्टीवर गावी येणार होते. मात्र नियतीला हे मान्य नव्हतं.

शहीद पोलीस शिपाई तौसिफ आरिफ शेख (वय ३४) हे पाटोदा शहरातील क्रांतीनगरमधील रहिवाशी आहेत. आरिफ शेख यांना तीन मुलं आहेत. त्यापैकी तौसिफ हे दुसऱ्या क्रमांकाचे होते. हॉटेलवर काम करून आरिफ यांनी मुलांना शिकवलं. आजही ते हॉटेलमध्ये काम करतात. मात्र, गरिब घरातील तौसिफ हे मोठ्या मेहनतीने २००९-१० च्या पोलीस भरतीमध्ये पोलीस दलात सहभागी झाले. त्यांचे दोन भाऊ औरंगाबाद येथे खासगी नोकरी करतात. पोलिसात भरती झाल्यानंतर तौसिफ यांचा २०१२ मध्ये शिबा उर्फ अंजुम यांच्यासोबत विवाह झाला. त्यांना ५ वर्षाचा ३ वर्षांचा असे दोन मुलं आहेत. पत्नी आणि मुलांना घेऊन तौसिफ हे गडचिरोलीत राहत होते. गडचिरोलीत नियुक्ती असल्याने कुटुंबियांना त्यांची नेहमीच काळजी वाटत असे. आई नेहमीच फोन करून त्यांची विचारपूस करायची. आज सकाळी देखील ते आईशी फोनवर बोलले. ‘तु माझी काळजी करू नकोस. मी मजेत आहे. तु स्वत:च्या तब्येतीची काळजी घे’ असा त्यांचा संवाद झाला आणि आजच तौसिफ यांचा जीवनप्रवास थांबला. तौसिफ यांचा आईशी झालेला संवाद अखेरचा असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली. तौसिफ शहीद झाल्याची माहिती मिळताच पाटोदा शहरातील व्यापाऱ्यांनी तातडीने आपापली दुकाने बंद करून तौसिफ यांना श्रद्धांजली अर्पण केली. शहीद जवान तौसिफ यांच्या जाण्यामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली आहे. तौसिफ यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. तर, तौसिफ यांचे सासरे रफिक अहमद पठाण हे पाटोदा पोलिसात एएसआय म्हणून कार्यरत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published.