Home » विशेष लेख » कृती कार्यक्रम तयार करा – जिल्हाधिकारी

कृती कार्यक्रम तयार करा – जिल्हाधिकारी

कृती कार्यक्रम तयार करा – जिल्हाधिकारी

डोंगरचा राजा/आँनलाईन

— शंभर टक्के मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नावीन्यपूर्ण कृती कार्यक्रम तयार करा

नांदेड – शाळेला भेट दिल्यावर बोलक्या आणि हुशार मुलांशी आपण संवाद करतो पण मागे असणारा अबोल विद्यार्थी का बोलत नाही. त्याला शिकवलेले समजत नसेल तर त्याला वाचण्यासाठी, गणित जमण्यासाठी आम्ही कोणता नवा पर्याय सुचवू शकतो, हे शाळा भेटीत पहावे. शंभर टक्के मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नावीन्यपूर्ण कृती कार्यक्रम तयार करा व तो अमलात आणा असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाचा आढावा व पुढील नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांची कार्यशाळा गुरुवार दिनांक 25 एप्रिल 2019 रोजी आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. मंचावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्री गोयल, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, समग्र शिक्षाचे लेखाधिकारी अमोल आगळे, डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता श्रीकृष्ण देशमुख, उमेश नरवाडे, उपशिक्षणाधिकारी के. टी. आमदूरकर यांची उपस्थिती होती .
जिल्हा परिषद शाळेत शिकलेले माजी विद्यार्थी, गावातील व शहरातील व्यावसायिक नेते मंडळी यांना शाळा विकासासाठी आवाहन करा. माजी विद्यार्थ्यांना बोलवा. त्यांचा शाळेत सत्कार करा. शाळा दाखवा. आपोआपच त्यांची मदत आपल्याला मिळू शकते. मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग मिळवून आपण शाळा सर्वांग संपन्न करू शकतो असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. ते सोलापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना शाळांमध्ये केलेले अनेक प्रयोग यावेळी विशद केले. निसर्गाशी विद्यार्थ्याचं नातं असावं, झाडं सावली देतात. ती वाढवली पाहिजेत. शाळेत सुंदरशी बाग तयार करावी, निसर्गाशी असलेली मैत्री विद्यार्थ्यांना अधिक संवेदनशीलता वाढवेल तसेच विद्यार्थी आरोग्यसंपन्न असेल तर शाळेत येऊ व टिकू शकेल. त्यासाठी आरोग्याच्या छोट्या छोट्या समस्या सोडवून विद्यार्थी सुदृढ राहील याकडे अधिक लक्ष देण्याचे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी उत्कृष्ट नियोजन व कृती करण्यावर भर दिला. योग्य दिशेने प्रवास केला तर ठरवलेल्या लक्ष्यापर्यंत पोहोचता येते असे सांगताना एकाच पद्धतीने संवेदना सुटल्या, एकाच विचाराने भारित होऊन आपण काम सुरू केले तर नांदेडचे नाव शैक्षणिक क्षेत्रात देशात अव्वल होईल असे म्हटले. शाळेची इमारत चांगली असेल. परिसर स्वच्छ, नीटनेटका असेल तर मुले शाळेत रमतील. मुले रमली तर टिकतात व शिकतात. त्यासाठी आधी शाळा व विद्यार्थी समोर ठेवून उत्कृष्ट नियोजन करा. कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे हे अधोरेखित करा म्हणजे शंभर टक्के मुलांची गुणवत्ता येईल असे कार्य नियोजन करा असेही त्यांनी सांगितले. जो विचार व्यक्त होतो तो कशावर पडतो याचा विचार करा. मनाच्या सुपीक जमिनीवर पडला तर भविष्यात ते अंकुरित होऊन आकारास येईल यासाठी पुढील वर्षीच वस्तुनिष्ठ नियोजन करण्यावर भर द्यावा या शाळेत आपण शिकलो त्या शाळेचे नाव पंचक्रोशीत व्हावे यासाठी नियोजन करावे असे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी केले.

दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत निवडक गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनी सादरीकरण केले. हे सादरीकरण स्वतः जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी ऐकले. शाळास्तरावर काय करणे अपेक्षित आहे, याच्या सूक्ष्म सूचना केल्या. त्यामुळे आजची कार्यशाळा मूलगामी चिंतन परिषद ठरली .
शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी उद्दिष्टे ठरवून कृती कार्यक्रम तयार करण्याचे आवाहन केले. गुणवत्तेची सर्व मानके पूर्ण करू शकू असे प्रयत्न गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी शाळा व विद्यार्थीनिहाय नियोजन करा. येत्या शैक्षणिक वर्षात हे अभियान अधिक गतीमान करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी गोयल यांनी रंजनातून शिक्षण ही संकल्पना मांडली. त्यांनी बिहार मधील अनेक शाळांचे दाखले दिले. शैक्षणिक गुणवत्तेचे प्रयत्न श्रीकृष्ण देशमुख यांनी विषद केले. उपशिक्षणाधिकारी के. टी. आमदूरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिक्षण विस्तार अधिकारी संतोष शेटकार, डायटचे उमेश नरवाडे, अतुल कुलकर्णी, यशस्वीतेसाठी समग्र शिक्षाचे सहायक लेखाधिकारी योगेश परळीकर, साहेब पांचाळ , सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास ढवळे, प्रकाश गोडणारे, प्रोग्रामर के .ए. काझी, उपशिक्षणाधिकारी दीपक शिरसाट, समन्वयक डी. टी. सिरसाठ, दिलीप मोकले आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.