Home » ब्रेकिंग न्यूज » अवैध वाळु उपसा थांबवणार- अस्तिक कुमार पाण्डेय

अवैध वाळु उपसा थांबवणार- अस्तिक कुमार पाण्डेय

अवैध वाळु उपसा थांबवणार- अस्तिक कुमार पाण्डेय

डोंगरचा राजा/आँनलाईन

— नैसर्गिक साधनसंपत्तीची हानी रोखण्यासाठी अवैध वाळु उपसा थांबवणार- अस्तिक कुमार पाण्डेय

— अवैध वाळु उपशाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा ‘बीड पॅटर्न’

— अडीच दिवस चाललेल्या मोहिमेत जिल्हयात 2262 ब्रास वाळु जप्त
— जप्त वाळु मुख्यालयात आणण्यासाठी ट्रक-टिपर-हायवा यांच्या 322 फेऱ्या
— महसुल व पोलीस यंत्रणेतील उपविभागीय
अधिकाऱ्यांपासून गावपातळीवरील कर्मचाऱ्यांचा समावेश
— अवैध बेसुमार वाळु उपसा रोखण्यासाठी प्रशासनाची योजना तयार
— नागरिकांना व्हीसल ब्लोअर होण्याचे आवाहन
— निवृत्त सैन्य अधिकारी जवानांचा पथकामध्ये समावेश होणार
— जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष व संपर्क क्रमांक कार्यान्वित होणार

बीड,दि,26:- नदी पात्रातील अवैधपणे बेसुमार वाळु उपसा होत असल्याने नैसर्गिक साधन संपत्तीला धोका पोहचत असून नदी खौऱ्यातील दुरपर्यंतच्या विहीरी, बोरवेल आदी जलस्त्रोतांचा उद्दभव आटून दुष्काळात पाणी टंचाई सारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. यासाठी अवैध वाळुउपशावर प्रतिबंध आणणे गरजेचे आहे. याचा विचार करता सर्वंकष उपाययोजना आखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योजना तयार केली असून त्याची अंमलबजावणी जिल्हयात केली जाईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज केले.
गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातून आणि काठावर साठवून ठेवण्यात आलेल्या 500 ब्रास वाळूसाठा जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय यांच्या नेतृत्वाखाली महसूल व पोलीस यंत्रणेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जप्त केला. सतत अडीच दिवस ( 60 तास ) चाललेल्या या मोहिमेत उपर जिल्हाधिकारी दत्त प्रसाद नडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील, उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी ए. एन. भोसले यांच्यासह तहसिलदार संगिता चव्हाण यांनी पहिल्या दिवसी तर उपविभागीय अधिकारी गणेश महाडीक, नम्रता चाटे, तहसिलदार हिरामण झिरवाळ तसेच नायब तहसिलदार, मंडल अधिकारी, तलाठी, पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला.
जप्त केलेली वाळू चोरीला जावू शकते यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, बीड आणि गेवराई तहसिल कार्यालय आवारात हलविण्यात आली. यासाठी पहिल्या दिवशी जवळपास 39 ट्रक-टिपर-हायवा आणि 4 जे.सी.बी. यांचा वापर केला. दुसऱ्या दिवशी एका पथकाद्वारे 43 ट्रक-टिपर-हायवा आणि 6 जे.सी.बी. यांचा तर पथक क्रमांक दोनद्वारे 6 जे.सी. बी., 49 ट्रक-टिपर-हायवा तर तिसऱ्या दिवशी 5 जे.से.बी. 30 ट्रक-टिपर-हायवा यांचा वापर करण्यात आला. गोदावरी नदी परिसरातील राज्यावाडी, गंगावाडी गावांच्या हदृदीतील सातभाई इनाम देवस्थान जमिन, गट नं. 39 आणि गंगावाडी नदीकाठावरील शेकडो ब्रास वाळु मुख्यालयात हलविण्यासाठी ट्रक-टिपर-हायवा यांना 322 फेऱ्या मारव्या लागल्या. यामध्ये पोलीस निरीक्षक जी. ए. मुंडे, पोलीस प्रवीण कुडुक, संतोष शिंदे, सुनील मस्के आदींचा सहभाग होता. या यंत्रणेला नियंत्रणासाठी जिल्हास्तरावरून कंट्रोल रुम तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आली होती.
अवैध वाळू उपशावर प्रतिबंधासाठी जिल्हाधिकारी यांचा बीड पॅटर्न
नैसर्गिक साधनसंपत्तीची अपरिमित हानी करणाऱ्या अवैध वाळू उपशाला आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांमध्ये-
दोषी गुन्हेगारांना एम.पी.डी.ए. कायदयाखाली कारवाई करण्यात येईल.
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर-ट्रक-टिपर-हायवा आणि उपसा करणाऱ्या जे.सी.बी. पोकलेन आदी यंत्रांची माहिती गोपनीयरित्या जमा करण्यात येईल आणि पुराव्यानिशी तीन महिन्या नंतर जप्त करुन गुन्हा दाखल केला जाईल.
जिल्हास्तरावर कंट्रोलरुम निर्माण करुन जिल्हा खनिकरण अधिकाऱ्यांमार्फत कारवाईवर नियंत्रण ठेवले जाईल.
जिल्हा खनिकरण अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक ( फ्लाईंग स्कॉड ) तयार करुन वाळू उपसा आणि वाहतूक घडणाऱ्या ठिकाणी अचानक धाड टाकून कारवाई केली जाईल.
वाळू वाहतूक होणाऱ्या महत्वाच्या मार्ग व ठिकाणांवर सी.सी.टी.व्ही. आणि कॅमेऱ्यांद्वारे निगराणी ठेवून व्हीडिओ रेकॉर्डिग केले जाईल.
वाळू माफियांना शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोणतीही सहाय करु नये यासाठी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
या कामासाठी आवश्यकतेनुसार सैन्य दलाच्या निवृत्त अधिकारी व जवान यांची नियुक्ती केली जाईल.
अवैध वाळु उपश्याविरोधात
नागरिकांना व्हीसल ब्लोअर होण्याचे आवाहन
नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या अवैध वाळू उपश्याविरोधातील मोहिमेत सहभागी होवून याची माहिती जिल्हा प्रशासनास दयावी असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय यांनी केले असून त्यांना सदर माहिती प्रशासन यंत्रणेला देता यावी यासाठी संपर्क क्रमांक व मोबाईल क्रमांक प्रसिध्द केला जाईल व माहिती देणाऱ्याचे नाव व ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे ते म्हणाले.
-*-*-*-*-*-

Leave a Reply

Your email address will not be published.