संतविचाराचा नंदादीप तेवत ठेवा – हभप.रामदासी
डोंगरचा राजा / आँनलाईन
आष्टी — जगातला कुठलाही धर्म कधीच हिंसा, द्वेष. मत्सर, वैरभाव, करायला शिकवत नाही. मानवी जीवनात दया, क्षमा , परोपकार, समता, बंधुता, एकता याच जीवन मूल्यांची शिकवण धर्म देतो. संतांनी याच जीवन मूल्यांची शिकवण दिली .देव फक्त देवळातच नाही तर चराचरात त्याचे अस्तित्व आहे. तो सर्व प्रथम माणसात आहे म्हणून माणसावर प्रेम करा. ज्याला चालत्या बोलत्या डोळ्यांनी दिसणार्या जिवंत माणसावर प्रेम करता येत नाही. तो न दिसणार्या देवावर कसा प्रेम करील ?
हाच उपदेश संतांनी केला आसल्याचे प्रतिपादन ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड ) यांनी केले.
आष्टी तालुक्यातील कोयाळ येथे श्रीरामनवमीनिमित्त अयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तनात ते बोलत होते.
पुढे बोलतांना ह,भ.प.राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प भरतबुवा रामदासी म्हणाले की, मनुष्य देह हा दुर्लभ आहे. तो महत्प्रयासाने मिळाला आहे. या देहाचे सार्थक करा. दुराचाराचे कर्म करून आयुष्याचा नाश करू नका. नित्य वाट्याला आलेले कर्म करीत असतांना देवाचे चिंतन करा. शुद्ध भावाने कर्म करा. संतांनी घालून दिलेल्या उपदेशाचे पालन करा. कारण आज विकार विवशतेच्या काळात संत विचारांची पणती सतत तेवत ठेवली तरच या देशात सामाजिक समता निर्माण होईल. हभप भरतबुवा रामदासी यांनी कीर्तना करिता संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा ” आता तरी पुढे हाची उपदेश , नका करू नाश आयुष्याचा ” हा उपदेश पर प्रकरणातील अभंग घेतला होता. संस्थानचे मठपती संतोष महाराज कुसूरकर रामदासी यांनी भरतबुवा यांचा भावपूर्ण सत्कार केला. कीर्तनासाठी परिसरातील हजोरा भावीक उपस्थित होते.