जनावरांचा बाजार दुष्काळातही तेजीत
डोंगरचा राजा/आँनलाईन
छावणी चालकांनो नियम पाळा – अँड.अजित देशमुख
बीड- जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता जाणवत असताना नेकनूर येथील जनावरांचा बाजार अद्यापही तेजीत आहे. जनावरांच्या किमती पावसाळ्यात असतात, त्याप्रमाणेच आहेत. तर जनावरांची आवक देखील तेवढीच आहे. त्यामुळे बाजारात म्हणाव्यात एवढ्या किमती ढासळलेल्या नसून जनावरांना आजही चांगला भाव आहे. जिल्ह्यात चालु असलेल्या चारा छावण्यांचा हा परिणाम असू शकतो. शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी चारा छावणी चालकांनो नियम पाळा, असे जनआंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यात एकीकडे दुष्काळाची तीव्रता जाणवत आहे. तर कधी नव्हे एवढ्या चारा छावण्या जिल्ह्यात मंजूर झालेल्या असल्याने शेतकऱ्यांच्या जनावरांना कमी भावात विकण्याची आवश्यकता पडली नाही. त्यामुळे पशुधन किंमत ढासळलेली नसल्याचे दिसते. शेतकऱ्यांसाठी ही बाब फायद्याची आहे.
जिल्ह्यात चारा छावण्यांचे नियम पाळले जात नाहीत. जनावरांना चारा आणि पेंड नियमाप्रमाणे दिला जात नाही. अशा अनेक तक्रारी आहेत. मात्र तरीही शेतकरी मिळतो त्या चाऱ्यामध्ये समाधानी आहे. शेतकऱ्यांवर अनेक चारा छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय होत असताना देखील दुष्काळात आपले पशुधन वाचत आहे, याचं त्याला समाधान आहे.
त्यातच या रविवारी नेकनूर येथील जनावरांच्या बाजारांमध्ये फेरफटका मारताना जनावरांच्या बाजारात जनावरांची संख्या कमी भासली नाही. जवळपास पेरणीच्या वेळी जनावरे बाजारात असतात तेवढीच जनावरे बाजारात होती. किंमती देखील त्याच प्रमाणात होत्या. त्यामुळे त्रास सहन करून का होईना, चारा छावण्या मुळे जिल्ह्यातील पशुधन वाचत आहे, असे दिसून आले.
शेतकऱ्यांसाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. त्यामुळे चारा छावणी चालकांनी नियम पाळून शासन नियमाप्रमाणे जेवढा चारा, पाणी आणि सुविधा जनावरांना पुरवायला हव्यात त्या सर्व पुरवाव्यात. म्हणजे शेतकर्याचा तळतळाट चालकांना लागणार नाही आणि पशुधन वाचविण्याचा शासनाचा उद्देश देखील सफल होईल, असे अँड. अजित देशमुख यांनी म्हटले आहे.