Home » माझा बीड जिल्हा » शौचालयात आठवडी बाजाराचे बीट..?

शौचालयात आठवडी बाजाराचे बीट..?

शौचालयात आठवडी बाजाराचे बीट..?

रविकांत उघडे/डोंगरचा राजा आँनलाईन –

माजलगाव — शहराच्या आठवडीत बाजारात व्यापारी नगर -पालिकेच्या सार्वजनिक शौचालयात भाजीपाल्याचे पोते ठेवून मालाचे बीट करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे माजलगावकरांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. खुलेआम सुरु असलेल्या या प्रकाराकडे मात्र नगरपालिका प्रशासन डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे.

माजलगावत बुधवार आणि रविवार असे दोन दिवस आठवडीबाजार भरतो. सध्या आठवडी बाजाराच्या जागेसंबंधीचा वाद न्याय प्रविष्ट आहे. यामुळे बाजार बायपासवर भरतो. येथे तालुक्यातील शेतकरी आणि व्यापारी विक्रीसाठी नियमित माल घेऊन येतात. आठवडीबाजाराच्या दिवशी येथे मोठी वर्दळ असते. सुरुवातीला सकाळी येथे शेतमालाचे बीट होते आणि नंतर भाजीपाला बाजारात येतो. मात्र, येथील साबळे सभागृहाच्या परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयातच व्यापारी शेतमालाचे बीट करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे असाच आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाने डोळेझाक न करता कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
लोकप्रतिनिधींची केवळ आश्वासने
प्रत्येक लोकप्रतिनिधी आठवडी बाजाराचा प्रश्न अधांतरी ठेऊन निवडणुकीत केवळ आश्वासने देतात. बाजाराच्या जागेचा प्रश्न सुटत नसल्याने सध्या बाजार बायपासवर भरत आहे. यामुळे येथे नियमित वाहतूककोंडी होते. याचा फटका नागरिक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसत आहे. अधिकृत जागा आणि सोयी सुविधा नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा आणि रहदारीचा मोठाप्रश्न येथे निर्माण झाला आहे.

स्वच्छतेमध्ये जिल्ह्यात पहिला क्रमांक
विशेष म्हणजे शहरात सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करीत शहर हागणदारीमुक्त झाल्याचे नगरपालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या श्रेणीमध्ये माजलगाव नगरपालिकेचा देशात 32 वा,मराठवाड्यात पाचवा तर बीड जिल्हयात पहिला क्रमांक आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.