Home » माझा बीड जिल्हा » प्रचाराच्या परवानसाठी एक खिडकी कक्ष

प्रचाराच्या परवानसाठी एक खिडकी कक्ष

प्रचाराच्या परवानग्यासाठी एक खिडकी कक्ष

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अंतर्गत 39-बीड लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विविध प्रकारच्या पूर्व परवानगी संबंधित शासन यंत्रणेकडून घेण्याची गरज आहे. याचा विचार करुन एक खिडकी पध्दती नुसार जिल्ह्यातील तालुकास्तरावर तहसिलदार कार्यालयामध्ये, उपविभागीय अधिकारी असणाऱ्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालयांमध्ये आणि जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विशेष एक खिडकी कक्षाची सुरवात करण्यात आली आहे. असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सांगितले आहे.
बीड लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणूक प्रचारासाठी उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि राजकीय कार्यकर्ते यांना निवडणूक प्रशासनाकडून विविध प्रकारच्या पूर्व परवानग्या लवकर मिळाव्यात यासाठी एक खिडकी कक्ष पध्दत सुरु करण्यात आली आहे. या एक खिडकी कार्यालयात प्रचाराशी संबंधित विविध परवानगी देणारे शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित राहून अर्जदारांकडून प्राप्त अर्जांवर नियमानूसार कार्यवाही करुन परवानगीचे प्रमाणपत्र देतील. अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्र, ना-हरकत प्रमाणपत्र आणि दाखले असल्यास प्रशासकीय यंत्रणेस तातडीने कामकाज करण्यास मदत होईल.
उमेदवारांना प्रचारापूर्वी कोणत्या परवानग्या आवश्यक आहेत, निवडणूक आचारसंहिता काळात कोणत्या गोष्टींवर प्रतिबंध आहे याची माहिती नामनिर्देशन पत्र दाखल करताना देण्यात आलेली आहे. तसेच आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शिका नियमांचा विचार करुन प्रचाराच्या पूर्व परवानग्या घेतल्या जाव्यात. यामध्ये राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय व राज्य पातळीवरील स्टार प्रचारकांच्या दौऱ्याप्रसंगी हेलिपॅड सारख्या विशेष प्रसंगी शासकीय यंत्रणेची मदत मिळावी यासाठी सशुल्क परवानगी दिली जाते, अशा विशेष परवानगीसह इतर बाबीसाठी देखील विहित कालमर्यादेत अर्ज दाखल करावा.
जिल्हयातील एक खिडकी कक्षांद्वारे केले जाणारे कामकाज आणि दिलेले प्रमाणपत्र यावर संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांचे नियत्रंण आहे. जिल्हास्तरावर एक खिडकी कक्षांमध्ये जिल्हा खनिकर्म अधिकारी आंनद पाटील हे कक्ष प्रमुख म्हणून काम पाहत असून यामध्ये पोलीस विभाग, नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग आदींचे अधिकारी कार्यरत आहेत. एक खिडकी कक्षांद्वारे प्राप्त होणारे अर्ज आणि दिलेली प्रमाणपत्रे यांचा अहवाल नियमितरित्या निवडणूक निरिक्षक, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि आचारसंहिता कक्ष यांना सादर केला जातो. या परवानग्या प्राप्त होण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय, संबंधित उपविभागीय अधिकारी, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आदींच्या ना-हरकत प्रमाण पत्रासह उमेदवारांनी अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी अर्ज सादर करुन पूर्व परवानगी घ्यावी.
*-*-*-*-*-*-*

Leave a Reply

Your email address will not be published.