Home » ब्रेकिंग न्यूज » तर.. मंत्रीपद सोडण्यास तयार – ना.आठवले

तर.. मंत्रीपद सोडण्यास तयार – ना.आठवले

तर.. मंत्रीपद सोडण्यास तयार – ना.आठवले

डोंगरचा राजा / आँनलाईन

रिपब्लिकन ऐक्याचे अध्यक्षपद प्रकाश आंबेडकर स्वीकारणार असतील तर मी मंत्रिपद सोडायला तयार आहे – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

महाड दि. 21 – रिपब्लिकन ऐक्य होणार असेल तर मी मंत्रिपद सोडायला तयार आहे. प्रकाश आंबेडकर रिपब्लिकन ऐक्यासाठी तयार असतील तर त्यांनी रिपब्लिकन ऐक्याचे अध्यक्ष व्हावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले. महाड येथे चवदार तळे सत्याग्रहाच्या 92 व्या वर्धापन दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षातर्फे ऐतिहासिक क्रांतिस्तंभ येथे आयोजित जाहीर अभिवादन सभेत ना आठवले बोलत होते. विचारमंचावर आरपीआय रायगड जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड; स्वागत अध्यक्ष सुमीत मोरे; आरपीआय ( आठवले) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर; आमदार भरत गोगावले; डीएम चव्हाण; सिद्धार्थ कासारे; सूर्यकांत वाघमारे; महेंद्र शिर्के; सुमीत वजाळे; चंद्रशेखर कांबळे; प्रावीन मोरे; हेमंत रणपिसे ; सचिनभाई मोहिते; अमित तांबे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

मी ज्यांच्या सोबत जातो त्या पक्षाची सत्ता येते ;त्यांना मुख्यमंत्री पद मिळते. त्या बदल्यात ते मला मंत्रिपद देतात तर बिघडले कुठे? माझ्या हाती आहे झेंडा निळा म्हणून त्यांचा आहे माझ्या मंत्रिपदावर डोळा ! माझे मंत्रिपद घालविण्याचा विचार करण्यापेक्षा रिपब्लिकन ऐक्य करून समाजात मंत्रीपद वाढविण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य करावे असे सांगत मला मंत्रीपदाची फिकीर नाही असे वक्तव्य ना रामदास आठवले यांनी करून रिपब्लिकन ऐक्याची साद आंबेडकरी जनतेला घातली.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 92 वर्षांपूर्वी महाड मध्ये पाण्याला स्पर्श करून मानवी मूलभूत हक्कांचा समतेचा लढा उभारून क्रांती केली. एका बाजूला आहे शिवरायांच्या रायगडाचा पहाड ; तर एका बाजूला आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिभूमीचा महाड असे ना रामदास आठवले म्हणाले. महाड चवदार तळे सत्याग्रहावेळी सनातनी विरोधकांनी सत्याग्रहिंवर दगडफेक केली. हल्ले केले. रक्तबंबाळ होऊन सत्याग्रही भीमसैनिक डॉ बाबासाहेब आंबेडकरांकडे येऊन आम्हाला प्रतिहल्ला करण्याची परवानगी मागू लागले तेंव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना हिंसेचे उत्तर हिंसेने देऊ नका असे बजावले. त्यांच्या डोक्यातील वाईट द्वेष विचार आज न उद्या दूर होईल असे सांगितले. त्यानुसार अज्ञान दूर झाल्याने आज चवदार तळ्याच्या पाण्याला आपण स्पर्श करताना कोणी विरोध करीत नाही. मानवी मूलभूत अधिकार कोट्यवधी शोषितांना मिळवून देण्याचा मानवमुक्तीचा लढा डॉ बाबासाहेब आंबेडकर जिंकले आहेत. त्या दिग्विजयी नेत्याचे स्वप्न साकार करण्यासाठी ;त्यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी; महाड क्रांतिदिनी अभिवादन करण्यासाठी आपण आलो आहोत असे ना रामदास आठवले म्हणाले.

समाजात विनाकारण तेढ निर्माण करणे योग्य नाही. मागसावर्गीयांसह सवर्ण सर्व समाज एकत्र आला पाहिजे. भारतीय दलित पँथर च्या शाखा स्थापन करताना मी सांगत होतो की सवर्ण समाजाविरुद्ध दलित पँथर नाही. समाजात समता निर्माण झाली पाहिजे या साठी मी काम करीत असून समाजिक ऐक्यासाठी आपण शिवशक्ती भीमशक्ती एकत्र केली. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे अशी मी पहिली मागणी केली होती असे ना रामदास आठवले यावेळी म्हणाले.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या रक्षणाची ताकद आमच्या भीमसैनिकांत आहे. काँग्रेस राष्ट्रवादी चे लोक संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून भांडणे लावीत आहेत.मी मात्र दोन समाजातील वाद मिटवितो. आपसात संघर्ष करणे योग्य नाही. अंतर्गत लढण्यापेक्षा पाकिस्तानला आम्ही धडा शिकवू असे ना रामदास आठवले म्हणाले. यावेळी मोठया संख्येने आंबेडकरी जनता उपस्थित होती.सभेपूर्वी ना रामदास आठवले यांनी चवदार तळ्यावर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. तसेच महाड क्रांतिभूमीतील क्रांतिस्तंभालाही त्यांनी अभिवादन केले. यावेळी राज्यभरातील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.