पत्रकारांना लवकरच पेन्शन – मुख्यमंत्री
डोंगरचा राजा / आँनलाईन
‘पत्रकारांच्या पेन्शन योजनेचा निर्णय झाला असून ही योजना लवकरच सुरू करण्यात येत आहे’, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.पत्रकारांना पेन्शन मिळावी यासाठी मराठी पत्रकार परिषदेने सातत्याने प्रयत्न आणि पाठपुरावा केला होता. अखेर परिषदेच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे.
मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार आज ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसाठी सरकारकडून सुरू करण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
‘पत्रकारांच्या पेन्शन योजनेची फाइल क्लीयर झाली आहे. त्यात आता कोणतीही अडचण उरलेली नाही. ती योजना आपण आता सुरू करत आहोत,’, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे नमूद केले. पत्रकारांच्या घरांच्या प्रश्नावरही त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. पत्रकारांच्या घरांसाठी म्हाडाच्या माध्यमातून योजना तयार करण्यात आली आहे. अर्थात या योजनेची व्याप्ती मोठी असल्याने त्यात विधिमंडळ व मंत्रालयाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना घर मिळेलच, याची खात्री नव्हती. ही बाब लक्षात घेऊन अशा पत्रकारांना या घरांमध्ये ५० टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. या योजनेसाठी जागा मिळाली आहे. प्रकल्पाचं स्वरूपही निश्चित झालेलं आहे, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले . येत्या एका महिन्यात यासंबंधीची कार्यवाही पूर्ण होईल. त्यात आचारसंहितेचा कोणताही अडथळा येणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.(मटाचया आधारे)