Home » माझा बीड जिल्हा » पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते भुमिपुजन

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते भुमिपुजन

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते भुमिपुजन
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन 
— पाटोदा येथे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते भुमिपुजन
पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम व
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
पाटोदा –  पाटोदा येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत व    निवासस्थान बांधकामाचे आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा  पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
                या कार्यक्रमास आ. भीमराव धोंडे, आ. सुरेश धस, जिल्हा परिषदेचे सभापती संतोष हंगे, पंचायत समिती सभापती पुष्पाताई सोनवणे, पाटोदा नगराध्यक्षा अनिता नारायणकर, उपसभापती संगीताताई मिसाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज नीला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, प. स.सदस्य सुवर्णाताई लांबरुड, महेंद्र नागरगोजे,देविदास शेंडगे, विद्याधर येवले, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता ए. एम. बेदरे, उपअभियंता डी. आर. साळवे, गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
                यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, जिल्हयात ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे करण्यात येत आहेत या विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामांना मंजुरी देण्यात आली आहे. येणाऱ्या काळात या सर्व पंचायत समितीच्या अद्यावत नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार असल्याने याचा फायदा सर्वांना होणार असून गरजू नागरिकांची कामेही वेळेत पूर्ण  होण्यास मदत होणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
                जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्त्याची कामे मोठया प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. ही सर्व गावे पक्क्या रस्त्यांनी जोडली जाणार आहेत. येणाऱ्या काळात ज्या गावांची रस्त्यांची मागणी आहे त्या गावांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. असे सांगून  जिल्ह्यातील रस्त्याची कामे पूर्ण झाल्यास ग्रामीण भागातील गावांना तसेच नागरिकांना याचा फायदा होणार आहे. जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग जात असून त्याची कामे प्रगतीपथावर आहेत. या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील नागरीक व शेतकऱ्यांना जोड व्यवसाय उभारण्यास मदत होईल.  महामार्गाच्या रस्त्यामुळे दळनवळणाची सुविधा चांगली झाल्याने नवीन उद्योगाची उभारणी होईल त्यामुळे त्या भागातील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
                पाटोदा येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत दोन मजली असून या इमारतीच्या बांधकामासाठी 350 लक्ष रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे. तसेच पंचायत समिती सभापती, अधिकारी, कर्मचाऱ्यासाठी एकूण 20 निवासस्थानाचे बांधकाम होणार असून यासाठी 460 लक्ष खर्चास प्रशासकीय मंजूरी प्राप्त आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची आष्टी,पाटोदा,शिरुर तालुक्यातील 424.43 कि.मी. लांबीची 95 कामे मंजूर असून या कामासाठी 250.55 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी पाटोदा येथे 356 लक्ष रुपये खर्चाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात येणाऱ्या राज्यमार्ग 56 ते ढवळेवाडी रस्त्याच्या कामाचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. तसेच पालकमंत्री पंकजा मुंडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानांतर्गत बचत गटांच्या महिलांना व पाटोदा पंचायत समितीकडून अपंग लाभार्थ्यांना शिलाई मशिन खरेदीसाठी आणि घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वाटप करण्यात आले. तसेच सुवर्णपदक विजेता खेळाडू धनराज गंगाराम नागरगोजे याचाही मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.
               यावेळी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याच्या कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते आज भूमीपूजन झाल्यामुळे या भागातील नागरिकांचा रस्त्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. तसेच जिल्हयातील सर्व पंचायत समितीच्या इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन दिला असल्यामुळे येणाऱ्या काळात सर्व तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या अद्यावत नविन इमारती तयार होतील, असे सांगून पाटोदा शहर पाणी पूरवठा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. पाझर तलाव दुरुस्तीसाठी डीपीडीसीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन द्यावा तसेच जनावरांसाठी चारा छावण्या, नागरिकांच्या हाताला काम उपलब्ध करुन देण्यासाठी मनरेगाची कामे सुरु करण्याची  गरज आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
              यावेळी बोलताना भिमराव धोंडे म्हणाले की, जिल्हयात कमी पाऊसामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न  निर्माण झाला असून टँकरने पाणी पुरवठा करण्याची गरज आहे. पाटोदा, आष्टी, शिरुर तालूक्यातील रस्त्याची कामे सुरु झाल्यामुळे त्या भागातील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. असे सांगून त्यांनी पीकविमा, रोहयोच्या माध्यमातून विहीर मंजूरी, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मंजूरी आदी प्रश्न  त्यांनी यावेळी उपस्थित केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला यांनी केले. या कार्यक्रमास या भागातील पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.