छत्रपती कारखान्याकडून संक्रांत गोड..
डोंगरचा राजा / आँनलाईन..
— छत्रपती कारखान्याकडून संक्रांत गोड ; शेतकऱ्यांचे खाती दोन हजार रुपयांनी पैसे वर्ग
माजलगाव : छत्रपती सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील उसाला शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता उसाला प्रतिटन २२५० रुपयांपेक्षा जादा भाव देण्यात येणार आहे.त्यातील दोन हजार रुपये प्रति मे. टन प्रमाणे पहिली उचल देण्यात आली असून शेतकऱ्यांची संक्रांत गोड करण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात २६ कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष मोहन जगताप यांनी दिली.
गतवर्षी दिवाळीपूर्वी बिड जिल्ह्यात सात साखर कारखाण्यांचा गाळप हंगाम सुरू झाला होता. त्यानंतर दोन महिने उलटले तरी ऊस दर किंवा पहिला हप्ता कोणी द्यायचा याची कोंडी कोणीच फोडली नव्हती.अगोदरच दुष्काळ त्यातही पंधरा दिवसांत पैसे द्यावे असा नियम असताना तो धाब्यावर गुंडाळून दोन महिने उलटले तरीही कारखानदारांनी शेतकऱ्यांना दमडाही दिला नव्हता, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. अशा परिस्थितीत येथील छत्रपती साखर कारखान्याने ही कोंडी फोडली.
या कारखान्याचा १८-१९ च्या हंगामात चार लाख मे टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून ८४ दिवसात १ लाख ५१ हजार ३५० में टन ऊस गाळप ९.८६ साखर उताऱ्यासह करून १ लाख ४९ हजार क्युन्टिल साखर उत्पादन केली आहे. कारखान्याने २० ऑक्टोबर ते ३१डिसेंबर २०१८ या दिवसात गाळप केलेल्या १ लाख २९ हजार मे टन उसासाठी पहिली उचल म्हणून दोन हजार रुपये प्रमाणे २५ कोटी ९२ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याचे मोहन जगताप यांनी सांगितले,यावेळी शेती समिती अध्यक्ष संतोष यादव, शेतकी अधिकारी सुनील खामकर उपस्थित होते. दरम्यान ऐन दुष्काळी परिस्थितीत संक्रांत कशी करायची या चिंतेत असलेल्या शेतकरी कुटुंबास छत्रपती कारखान्याच्या या ऊस बीलामुळे दिलासा मिळाला आहे, त्यातून त्यांची संक्रांत गोड होणार आहे.