Home » राजकारण » व्यक्तीस्वातंत्र्यांवरच घाला – खा.चव्हाण

व्यक्तीस्वातंत्र्यांवरच घाला – खा.चव्हाण

व्यक्तीस्वातंत्र्यांवरच घाला – खा.चव्हाण

डोंगरचा राजा / आँनलाईन

तपास यंत्रज्ञांना दृष्टीदोष झाला आहे का?

मुंबई दि. २१ डिसेंबर २०१८

देशातील 10 महत्त्वाच्या तपास यंत्रणांना कोणत्याही कॉल आणि इंटरनेट डेटावर नजर ठेवण्याची परवानगी सरकारने दिली आहे. हा नागरिकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा आणण्याचा प्रकार असून काँग्रेस पक्ष याचा तीव्र शब्दात निषेध करत आहे. अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

गांधीभवन येथे पत्रकारपरिषदेला संबोधित करताना खा. अशोक चव्हाण म्हणाले की, केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार सीबीआय, आयबी, एनआयए, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, सक्तवसुली संचनालय, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स, डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स, रॉ, दिल्ली पोलीस आयुक्त, डायरेक्टरेट ऑफ सिग्नल इंटेलिजन्स या दहा एजन्सी लक्ष ठेवणार आहेत. या एजन्सी कोणाचेही फोन टॅप करू शकतात. पूर्वीप्रमाणे आता यासाठी गृहमंत्रालयाच्या परवानगीची गरज नाही. तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किती डेटा आहे? कोणता डेटा आहे? तुम्ही काय पाहता? आणि काय स्टोअर करता? या सर्वांवर आता या एजन्सीजना पाळत ठेवता येणार आहे. म्हणजे सरकार तुमच्या मोबाईल आणि कॉम्प्युटरमध्ये सर्रासपणे डोकावणार आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून लोकांवर पाळत ठेवण्याचे गुजरात मॉडेल मोदी शाह देशभरात लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस पक्ष या निर्णयाचा तीव्र विरोध करत असून सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी खा. चव्हाण यांनी केली.

ते पुढे बोलताना म्हणाले की, सोहराबुद्दीन नावाची व्यक्ती या जगात अस्तित्वात होती का? जर ती व्यक्ती अस्तित्वात होती तर त्या व्यक्तीने स्वतःच स्वतःचा खून करून घेतला असावा. मोदींच्या राज्यात अनेक व्यक्ती अचानक लुप्त होतात आणि पुढे भविष्यात अशा व्यक्तींची नावे दंतकथेत सामिल होतात. ती माणसे अस्तित्वात होती की नाही हे प्रश्न भविष्यात विचारले जातील आणि त्याचेही उत्तर मिळणार नाही. कारण त्याचेही सबळ पुरावे उपलब्ध नसतील अशी तपास यंत्रज्ञांची स्थिती झाली आहे.

मोदी सरकार आल्यानंतर देशातील तमाम तपास यंत्रणांना दृष्टीदोष झालाय की काय? अशी शंका येते कारण त्यांना कोणत्याही केसेसमध्ये पुरावे दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्या दृष्टीची तपासणी करावी लागणार आहे. भाजपाशी संबंधित सर्व आरोपी त्यांना आता संत महात्मे वाटू लागले आहेत आणि भाजपाचा लोकशाही मार्गाने विरोध करणारे सर्व अट्टल गुन्हेगार वाटू लागले आहेत. सोहराबुद्दीन हत्याकांडातील अनेक साक्षीदारांना अचानक उपरती झाली आणि त्यांनी आपले जबाब फिरवले. व सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. नुकतेच एका पोलीस अधिका-याने हरेन पंड्या हत्याकांडाशी या एन्काऊंटरचा संबंध जोडला होता. त्या पोलीस अधिका-याचा आवाजही सरकारी यंत्रणांना ऐकू आला नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.