Home » माझा बीड जिल्हा » लोकनेते स्व.मुंडेंच्या चित्रांचे पुण्यात प्रदर्शन

लोकनेते स्व.मुंडेंच्या चित्रांचे पुण्यात प्रदर्शन

लोकनेते स्व.मुंडेंच्या चित्रांचे पुण्यात प्रदर्शन

डोंगरचा राजा / आँनलाईन..

— शेवगांवच्या शितलकुमार गोरे यांच्या कुंचल्याने जागवल्या मुंडे साहेबांच्या आठवणी

— कलाकाराच्या निस्सिम प्रेमाचे
ना. पंकजाताई मुंडे यांनी केले कौतुक

पुणे दि. २१ —— एखाद्या व्यक्तिची व्यक्तीरेखा रेखाटणं किंवा मुर्ती तयार करणं हे सोपं काम नाही, त्यात समर्पणाची भावना असावी लागते आणि हीच भावना चित्रकार शितलकुमार गोरे यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या चित्र प्रदर्शनातून रेखाटली आहे, हे प्रदर्शन कलाकाराच्या मुंडे साहेबांवरील निस्सिम प्रेमाची साक्ष देणारेच आहे अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी शेवगांवच्या चित्रकाराची मुक्तकंठाने प्रशंसा केली..निमित्त होते लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यात भरलेल्या चित्र प्रदर्शनाचे…

शेवगांव जि. नगर येथील प्रसिद्ध चित्रकार शितलकुमार गोरे यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यावर ‘ एक वादळ चित्रबध्द करतांना..’ या विषयांवर बालगंधर्व रंगमंदिरात व्यक्त चित्र प्रदर्शन साकारले आहे. या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट तर प्रमुख पाहूणे म्हणून सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, आ. माधुरी मिसाळ, महापौर मुक्ता टिळक उपस्थित होत्या. हे प्रदर्शन आज व उद्या नागरिकांसाठी खुले असणार आहे.

एखाद्या गोष्टीत कलाकार कसा जिवंतपणा आणू शकतो हे या चित्र प्रदर्शनातून दिसून येत असल्याचे सांगत ना. पंकजाताई मुंडे पुढे बोलतांना म्हणाल्या की, शितलकुमार गोरे यांनी अतिशय समर्पक भावनेने हे प्रदर्शन भरवले. मुंडे साहेबांच्या प्रत्येक चित्रातून त्यांनी हेच भाव व्यक्त करत जिवंतपणा आणला आहे. कलाकाराला कितीही दुःख असले तरी तो आपली कला तितक्याच ताकदीने रेखाटतो तद्वतच राजकारणात काम करत असताना कितीही दुःख वाट्याला आले तरी जनतेला सेवा दिलीच पाहिजे. माझ्या वडिलांच्या चित्रापेक्षा त्यांची मुंडे साहेबांवर असलेली श्रध्दा व निस्सिम प्रेमाचा मी आदर करते अशा शब्दांत त्यांनी गोरे यांनी रेखाटलेल्या चित्रांची प्रशंसा केली.

*चित्रातून जागवल्या आठवणी*
————————————–
ना. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी चित्र प्रदर्शनाची सर्व दालनात फिरून पाहणी केली. मुंडे साहेबांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग व आठवणी या निमित्ताने पुन्हा एकदा ताज्या झाल्या. गोरे यांनी प्रदर्शनातील चित्रं इतक्या सुबकतेने रेखाटली की जणू मुंडे साहेब आपल्याच अवतीभवती असल्याचा भास प्रदर्शन पाहणा-या प्रत्येकांना जाणवत होता. या प्रदर्शनाने मोठ्या संख्येने आलेले पुणेकरही भारावून गेले.
••••

Leave a Reply

Your email address will not be published.