देवदहीफळच्या यात्रेस जल्लोषात प्रारंभ
डोंगरचा राजा / ऑनलाईन
■ खंडोबाचं लगीन लागलं
■ जंगी कुस्त्यांची उद्या दंगल
महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदहिफळ येथील श्री मल्हारी म्हाळसाकांत खंडोबाच्या यात्रेस जल्लोषात प्रारंभ झाला आहे.आज (दि.13) रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत म्हाळसा व खंडेरायाच्या लग्नाचा सोहळा पार पडला. तर उद्या ( दि.14) रोजी कुस्त्यांच्या दंगली होणार असुन तब्बल दिड महिना चालणाऱ्या यात्रेची गावकऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे.
प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी देवदहीफळ ता.धारुर येथे खंडोबाच्या यात्रेस उत्साहात सुरुवात झाली आहे. नागदिवे पूजनाने यात्रेला प्रारंभ झाला. दिंद्रुड येथून ढोल व झांज पथकाच्या निनादात वाजत-गाजत मानाच्या काठीचे तसेच बाभळगाव व साळेगाव (कोथरुळ) येथून मनाच्या पालखीचे देवदहीफळ येथे आगमन झाले.
मानाच्या पालख्यांचे व काठीचे गांवकऱ्यांनी आनंदाने स्वागत केले. रात्री उशिरा पर्यंत शोभेची दारु उडवण्याचा कार्यक्रम झाला. ज्यामुळे सारा आसमंत उजळून निघाला. गुरुवार(दि.13) रोजी सूर्योदयापूर्वी खंडेरायाच्या लग्नाचा सोहळा रंगला. खंडोबा-म्हाळसाच्या या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्यासाठी भल्या पहाटे हजारो भाविक कुडकूडणाऱ्या थंडीत उपस्थित होते.
आज महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या उपस्थितीत कुस्त्यांच्या दंगली होणार आहेत. मल्लांना १ रुपयांपासून रोख ५००१ रुपये पर्यंत बक्षीसे, मानाचा फेटा बांधण्यात येणार असल्याची माहिती यात्रा उत्सव समितीने दिली आहे.
तब्बल दिड महिना चालणारी राज्यातील ही एकमेव यात्रा अाहे. यात्रेत व्यापाऱ्यांनी आपापली विविध वस्तूंची दुकाने थाटली आहेत. फिरते सिनेमागृह व लोकनाट्य तमाशा मंडळासारखे मनोरंजनाची साधने रसिकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. लाखो भाविक हजेरी लावत असल्याने यात्रेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दिंद्रुड पोलीस स्टेशनचे सपोनि सचिन पुंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस कर्मचारी यांनी चोख नियोजन केले आहे. तसेच वाहनांची गर्दी होऊ नये म्हणून वाहनतळ करण्यात आले आहेत. गावातील स्वयंसेवक पोलिसांना मदत करतात.