नवटकेंना तात्काळ बडतर्फ करा – कागदे
डोंगरचा राजा / ऑनलाईन..
बीड,दि.2(प्रतिनिधी):- माजलगाव विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी वडवणी तालुक्यातील केंडेपिंप्री दलित प्रकरणात आरोपीला सहकार्य केलेले आहे. त्याचबरोबर दलितांच्या विरोधात 307 ची फिर्याद कशी लिहायची यासह दलितांविरोधी अपमानास्पद वक्तव्यही केले आहे. त्या वक्तव्याचा त्यांचा व्हिडीओ देखील व्हायरल झालेला आहे. जबाबदार व्यक्ती असताना एखाद्या जातीधर्माबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करणे चुकीचे आहे. त्यामुळे त्यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून तात्काळ बडतर्फ करावे आशा मागणीचे निवेदन औरंगाबाद विभागाचे पोलीस महानिरीक्षक यांना युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी रविवारी दिले आहे.
पोलीस प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माजलगाव विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांची भूमिका समाजामध्ये तेढ निर्माण करणारी आहे. तशा प्रकारच्या वक्तव्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झालेला आहे. पोलीस प्रशासनातला जबाबदार असलेला अधिकारी आशा प्रकारचे वक्तव्य करीत असेल तर सामान्य जनतेला न्याय हा कधीच मिळणार नाही. तसे पाहिले गेले तर पोलीसांवर सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याची महत्वची जबादारी असते. त्यामुळे पोलीस प्रशासनातल्या अधिकार्याने जातीधर्माच्या पलीकडे जावून आपले कर्त्यव्य बजावणे गरजेचे आहे. परंतु असे असताना संविधानाच्या नितीमुल्यांची चौकट ओलांडून भाग्यश्री नवटके यांनी दलितांबद्दल बेजबाबदारपणे वक्तव्य केलेले आहे. या प्रवृत्तीला वेळीच लगाम लावला नाही तर समाजा-समाजामध्ये तंटे लावण्याचे काम भाग्यश्री नवटके केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे तात्काळ कारवाई करीत त्यांना बडतर्फ करावे. अन्यथा रिपाइंकडून राज्यभर आंदोलने केले जातील असा ईशारा औरंगाबाद विभागाचे पोलीस महानिरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्यासह अमर विद्यागर, मिलिंद पोटभरे, अॅड.सुरेश वडमारे, गोट्या वीर यांनी दिला आहे.