Home » माझा बीड जिल्हा » कवडीमोल दराने सर्जा-राजाची विक्री..

कवडीमोल दराने सर्जा-राजाची विक्री..

कवडीमोल दराने सर्जा-राजाची विक्री..

रविकांत उघडे /डोंगरचा राजा ऑनलाईन

माजलगाव दि.24(प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षांपासून नियमितपणे भरणाऱ्या माजलगाव तालुक्यातील पात्रुडच्या जनावरांच्या बाजारात वेगळेच चित्र निर्माण झाले आहे. दुष्काळ व पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे धडधाकट जनावरे सांभाळणे अशक्यप्राय झालेल्या शेतकऱ्यांचा कल ती जनावरे विकण्याकडे दिसून येत आहे. त्यामुळे विक्रीसाठी येणाऱ्या जनावरांची संख्या वाढली असताना ती खरेदी करणाऱ्यांची मात्र वानवा आहे. नेहमीच्या तुलनेत खूपच कमी दर मिळत असल्याने कवडीमोल भावाने जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सलग चार ते पांच वर्षापासुंचा दुष्काळ,नापिकी यामुळे मराठवाड्याची ओळख आता दुष्काळवाडा म्हणून झालीय त्याचं कारण म्हणजे या भागात पडणारा अत्यल्प पाऊस अन् त्यामुळे होणारी नापीकी गेल्या काही वर्षापासून दुष्काळ हा मराठवाड्याच्या पाचवीलाचं पुंजलाय असं म्हणणं आता वावगं ठरणार नाही.अशा दुष्काळी परिस्थितीमुळे तलाव आटले,माजलगाव धरणासहित इतर छोटी तलाव मॄत साठ्यात गेल्यामुळे पाणी प्रश्न आता सर्वत्र गंभीर बनला आहे.तर जनावरांच्या चारा-पाण्याच्या टंचाई अभावी शेतकरी जनावरांच्या दावणीच्या दावणी विक्रीसाठी बाजारात आणत असून त्यालाही आता म्हणावी तशी किंमत येत नसल्याने शेतकरी मिळेल त्या कवडीमोल भावात जनावर विकु लागले आहेत.
तालुक्यातील पात्रुड मध्ये जनावरांचा आठवडी बाजार भरतो.दिंद्रुड,तेलगाव,लोणगाव,सिरसाळा,माजलगाव,गंगामासला,नित्रुड तसेच इतर भागातील शेतकरी आपली जनावरे या ठिकाणी विक्रीसाठी आणतात. त्यामध्ये बैल, गायी, म्हशी, बकरी आदींचा समावेश असतो. याआधी शेजारील इतर तालुक्यातील भागातूनही शेतकरी येत होते. मात्र, यंदा तिकडचे प्रमाण कमी झाले आहे. यंदाच्या दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर, जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय अडचणीचे झाले आहे.
त्यामुळे ती विकण्याकडेच त्यांचा अधिक कल आहे. मात्र, बाजारात योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. नेहमीच्या तुलनेत २५ ते ३० टक्के कमी भाव झाल्याने तो परवडत नाही. त्यामुळे एकतर कवडीमोल भावानेही जनावरे विकणे अथवा आल्या पावली परत जाणे, असे पर्याय त्यांच्यासमोर आहेत. अत्यल्प पावसामुळे शेतात उभी पीकं करपून गेली त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी खरीपाच्या पेरणीचा खर्च निघेल की नाही याची शाश्वती नाही.जनावरांच्या चारा अन् पाण्याची समस्या अत्यंत गंभीर दिसत असल्याने शेतकरी आता पशुधन बाजारात विक्रीसाठी आणत असून चारा अन् पाण्याच्या टंचाईमुळे सर्ज्या राजा वर कमी किंमतीतचं गुलाल पडू लागल्याच चित्रं सध्या माजलगाव तालुक्यातील पात्रूड येथील आठवडी बाजारात पहावयास मिळत आहे. दुष्काळी परिस्थिती नव्हती, तेव्हा याउलट परिस्थिती होती. जनावरे खरेदीसाठी चांगली मागणी होती.आता तर बैल,म्हैस विक्रीसाठी आणण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.
ग्रामीण भागातील विहीर,बोअर,हातपंप आटले असून पिण्याच्या पाण्याची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे तर जनावरांना होणारी चारा टंचाई अशा परिस्थितीत पशुधन जगवायचं कसं ? यासाठी सरकारकडून चारा छावणी सह पिण्याच्या पाण्याची ही व्यवस्था तात्काळ करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.