पुरस्कारांची घोषणा लवकरच – पंडित
डोंगरचा राजा / आँनलाईन..
— शारदा प्रतिष्ठानच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण शिक्षक दिनी होणार.
गेवराई — येथील शारदा प्रतिष्ठानच्या आदर्श शिक्षक पुरस्काराला शैक्षणिक क्षेत्रात मानाचे स्थान आहे. प्रतिष्ठानचे आदर्श शिक्षक पुरस्कार दि.५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी मान्यवरांच्या शुभहस्ते दिले जाणार आहेत. निवड समितीची पडताळणी अंतिम टप्प्यात असून लवकरच आदर्श शिक्षकांची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी आ.अमरसिंह पंडित यांनी दिली आहे. गेवराई विधानसभा मतदार संघातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या गुरुजनांचा गौरव व्हावा, शैक्षणिक क्षेत्रात अधिकाधिक प्रगती होण्याच्या दृष्टीने आ.अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा प्रतिष्ठान या सामाजिक स्वयंसेवी संस्थेकडून दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याचे प्रतिष्ठानचे हे अकरावे वर्ष आहे. दि.५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या औचित्याने समारंभपूर्वक मान्यवरांच्या शुभहस्ते आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण होणार आहे. शारदा प्रतिष्ठानकडून गेवराई विधानसभा मतदार संघातील प्राथमिक शाळेतील ७ शिक्षकांना, १ विशेष शिक्षक, अल्पसंख्यांक विभागातील १ शिक्षक आणि खाजगी माध्यमिक विभागातील २ शिक्षक असे ११ आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जाणार आहेत. शारदा प्रतिष्ठानच्या आदर्श शिक्षक पुरस्काराला शैक्षणिक क्षेत्रात मानाचे स्थान असून याला मोठी परंपरा लाभली आहे. प्रतिष्ठानच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्यातील अनेक नामवंतांनी यापूर्वी हजेरी लावली आहे. गेवराईतील ज्येष्ठ शिक्षणतज्ञ तथा माजी शिक्षण सभापती नारायणराव मोटे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची नुकतीच बैठक संपन्न झाली. ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी प्रविण काळम पाटील, शिक्षक पतसंस्थेचे विष्णू खेत्रे, आदर्श शिक्षक तात्यासाहेब मेघारे, मुख्याध्यापक विजय डोंगरे यांच्यासह प्रतिष्ठानच्यावतीने समन्वयक म्हणून प्राचार्य डॉ.शौकत पटेल हे या बैठकीला उपस्थित होते. निवड समितीच्या पहिल्या बैठकीत गेवराई विधानसभा मतदार संघातील शैक्षणिक क्षेत्रात विशेष व अतुलनीय काम करणार्या शिक्षकांच्या कामा बाबत आढावा घेण्यात आला. शारदा प्रतिष्ठानकडून स्थापन करण्यात आलेल्या या निवड समितीमधील सदस्य अत्यंत तटस्थ असून त्यांना शैक्षणिक क्षेत्राचा मोठा अनुभव आहे. पुरस्कारासाठी शारदा प्रतिष्ठान कोणाचेही प्रस्ताव स्विकारत नाही. शैक्षणिक क्षेत्रातील विशेष कामगिरीचे तटस्थ निवड समितीकडून होणार्या मुल्यमापनाच्या आधारे हे पुरस्कार दिले जातात अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यवाह माजी आ.अमरसिंह पंडित यांनी दिली.