Home » ब्रेकिंग न्यूज » अंबाजोगाईत पहिली ओपन हार्ट सर्जरी..

अंबाजोगाईत पहिली ओपन हार्ट सर्जरी..

अंबाजोगाईत पहिली ओपन हार्ट सर्जरी
डोंगरचा राजा / आँनलाईन
— स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या 
इतिहासात झाली सुवर्ण नोंद.
अंबाजोगाई — येथील स्वा.रा.ती. वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील सर्जरी विभागाअंतर्गत आज पहिल्यांदाच हृदयविकारांवर मात करणारी पहिली ओपन हार्ट सर्जरी यशस्वीरीत्या पुर्ण करण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या 35 वर्षाच्या इतिहासातील ही सुवर्ण नोंद ठरणार आहे.
   स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्जरी विभागाच्या शस्त्रक्रिया गृहात आज 24 आँगस्ट, शुक्रवारी पहिली ओपन हार्ट सर्जरी पार पडली. लातूर येथील प्रसिद्ध हृदय शल्यचिकीत्सक डाॅ. सयाजी सरगर, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्जरी विभागप्रमुख डाॅ.नितीन चाटे, डाॅ.सतिश गिरेबोईनवाड यांच्या  टिमने ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार  पाडली. या शस्त्रक्रियेसाठी भुलरोग तज्ञ म्हणुन डाॅ.गणेश निकम, डाॅ.अपर्णा कुलकर्णी , डाॅ.देवानंद पवार ,डाॅ.प्रसाद सुळे आदींनीही योगदान दिले.
इफ्तिकार मणियार (वय २२, रा. रविवार पेठ, अंबाजोगाई) या गरीब परिस्थितीतील युवकाला जन्मत: हृदयविकाराचा गंभीर आजार (Patent Ductus Arteriosus) होता. या आजारावर उपचाराचा भाग म्हणून ही शस्त्रक्रिया करण्यात आली. जन्मत: हा आजार होतो, परंतु शस्त्रक्रीयेअभावी बालवयातच रुग्ण दगावण्याचे प्रमाण प्रचंड असल्याने तरुण युवकांमध्ये हा आजार आढळणे वैद्यकीयदृष्ट्या अतिशय दुर्मिळ बाब आहे. इफ्तिकार यांची गंभीर अवस्था आणि हलाखीची आर्थिक परिस्थिती पाहून स्वाराती रुग्णालयातील सर्जरी विभागातील डॉक्टरांनी ही अवघड शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि अत्यंत कौशल्याने शस्त्रक्रीया सुखरूप पार पाडली. इफ्तिकारवरील शस्त्रक्रीया पूर्णपणे यशस्वी झाली असून त्याची तब्येत आता वेगाने सुधारत आहे.
दरम्यान, हि अवघड शस्त्रकीया निर्धोकपणे यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल स्वारातीच्या शल्यचिकित्सा विभागातील डॉक्टरांचे कौतुक होत आहे. पस्तीस वर्षांमध्ये प्रथमच झालेली सदरील दुर्मिळ प्रकारची शस्त्रक्रीया यशस्वी होणे ही मोठी आनंददायक घटना असून हृदयावरील याहुन मोठ्या बायपास सारख्या शस्त्रक्रीयांसाठी आम्ही सज्ज आहोत असा विश्वास अधिष्ठाता डाॅ. सुधीर देशमुख यांनी यानिमित्ताने बोलताना व्यक्त केला. सदरील अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. सुधीर देशमुख, सर्जरी विभागाचे विभागप्रमुख डाॅ. नितीन चाटे, डॉ. सतीष गिरेबोईनवाड तसेच हृदयरोग शल्यचिकीत्सक डाॅ.सयाजी सरगर यांचे अनेकांनी अभिनंद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.