राष्ट्रीय महामार्गावर सिग्नल चोर सक्रिय !
रविकांत उघडे /डोंगरचा राजा आँनलाईन
— कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर सिग्नल चोर सक्रिय !
— आठ सिग्नलची चोरी ; एक लाख साठ हजार नुकसान
कल्याण विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग क्र.61 माजलगाव शहराच्या बाहेरुन जात असून त्याचे काम प्रगती पथावर असून या रस्त्यावर काही दिवसापुर्वी सौर उर्जेवरील पिवळ्या रंगाचे सिग्नल व त्यावर बॅटरी असलेले पोल रस्त्याच्या बाजुला व काही ठिकाणी मधोमध लावण्यात आले होते.परंतु महीना पूर्ण होत नाही तोवरचं एक लाख साठ हजार किंमतीचे सिग्नल व त्यावरील बॅटऱ्या चोरी गेल्या आहेत.
महामार्गावर एकूण 120 पिवळ्या रंगाचे सिग्नल बसवण्यात आले होते.त्यापैकी 8 सिग्नल चोरट्यांनी लंपास केले असून त्याची एका पॅनल सेटची किंमत ही वीस हजार रुपये एवढी असून असे आतापर्यंत आठ पॅनल सेट चोरीला गेले आहेत तब्बल एक लाख साठ हजार रुपये किंमतीचे सिग्नल चोरी गेले आहेत.त्या बरोबरच महामार्गाच्या 60 साइन बोर्डवर दगड मारुन नासधुस करण्यात आली असून स्पीड लिमिट, ॲडव्हांस डायरेक्षन बोर्ड यासह विविध फलकांची देखील नासधुस करण्यात आली.रस्त्यांच्या मधोमध लोखंडी डिव्हायडर बसविले आहेत परंतु ते देखील नागरिकांनी मधला मार्ग म्हणून ठिकठिकाणी कापले असल्याची माहिती कर्मचारी जयदीप देशमुख यांनी बोलतांना दिली आहे.
माजलगाव शहराच्या विकासाच्या दॄष्टीने हा राष्ट्रीय महामार्ग दळणवळणासाठी महत्वाचा दुवा मानला जातो.यासाठी संबधित विभागाने यावर कोट्यावधींचा निधी खर्च केला आहे.महामार्गावर अपघात होवू नये यासाठी वळण असल्या ठिकाणी व पुढे बस थांबा असल्याने सुसाट वाहनांचा वेग कमी व्हावा म्हणून सौर उर्जेवर चालणारे लोखंडी पोलवर पिवळ्या रंगाचा सिग्नल बसवण्यात आले.परंतु चोरट्यांनी ते गायब केल्यामुळे अधिकार्यांसमोर याबाबत पेच निर्माण झाला आहे.सिग्नल बसवले तर चोरी जात आहेत.न बसवले तर अपघाताची शक्यता अशी दुहेरी अडचण महामार्ग विभागा प्रशासन यांच्यासमोर निर्माण झाली आहे.