Home » माझा बीड जिल्हा » ना.मुंडेंची आंदोलनकर्त्यांशी थेट..भेट

ना.मुंडेंची आंदोलनकर्त्यांशी थेट..भेट

ना.मुंडेंची आंदोलनकर्त्यांशी थेट..भेट

डोंगरचा राजा /;ऑनलाईन..

*मराठा आंदोलकांची दूत म्हणून सरकारमध्ये बाजू मांडू*

_आंदोलनस्थळी मराठा समाज बांधवांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा_

परळी दि.२६ —- मी याठिकाणी मंत्री किंवा लोकप्रतिनिधी म्हणून आले नाही तर वंचितांसाठी आयुष्यभर संघर्ष करणा-या नेत्याची कन्या म्हणून तसेच आपल्या पीडा जाणून घेण्यासाठी इथं आले आहे. गेल्या नऊ दिवसांपासून या ठिकाणी करण्यात येत असलेल्या ठिय्या आंदोलनाचा आणि मराठा समाजाच्या न्याय मागण्याचा सकारात्मक विचार निश्चितच केला जाणार आहे. मंत्री म्हणून नाही तर मराठा आंदोलनाची दूत म्हणून सरकारमध्ये आपली बाजू मांडू. चर्चेसाठी आपण तयारी दाखवावी निश्चितच न्याय मिळेल अशा ठाम विश्वास राज्याच्या ग्रामविकास, महिला व बाल विकास तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज मराठा समाज बांधवांना दिला. वाढदिवस असतांनाही तो बाजूला ठेवून ना. पंकजाताई मुंडे यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला भेट देवून समाज बांधवांशी थेट संवाद साधला.

पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे हया आज परळी दौ-यावर आल्या होत्या. त्यांचा आज वाढदिवस होता परंतू कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा बाजूला ठेवून शहरात येताच सर्वात पहिल्यांदा त्यांनी तहसील कार्यालयाच्या मैदानात सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलनाला भेट दिली. आंदोलनकर्त्यांच्या वतीने सुरूवातीला आबासाहेब पाटील यांनी ना. पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या.

यावेळी बोलताना ना पंकजाताई मुंडे मी मंत्री म्हणून नाही तर तुमची दूत म्हणून इथे आल्याचे सांगितले. मी आज सत्तेत असले तरी यापूर्वी विरोधी आमदार असतांना मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केलेली आहेत. मराठा समाजाच्या ज्या मागण्या मी आता ऐकल्या आहेत त्यात मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन ठेवावे, आरक्षणाची तारीख व वेळ निश्चित करणे, प्रस्तावित मेगाभरती नोकरभरती, शैक्षणिक सवलती, शेतकर्‍यांना संरक्षण, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळास भरीव निधी आदी बाबत सकारात्मक दृष्टीने विचार करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. माझ्या मनात स्वच्छ भावना आहेत. मला जातीपातीच्या भिंती तोडून राजकारण करायचंय असे त्या म्हणाल्या.

सामान्य माणसाला काय पीडा असते याची मला पूर्णतः जाणीव आहे. छोट्या सामाजिक घटकातून येऊन नेतृत्व करताना उपेक्षित वंचितांचा पीडेशी मला संवेदना आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी मराठा आरक्षणाबाबत आपला पाठिंबा असल्याची भूमिका छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत भगवानगडावरून घेतली होती. तीच आमची भूमिका आहे. मराठा आरक्षणाचा विषय हा न्यायालयाच्या पटलावर असल्याने त्याबाबत निर्णय होण्यास विलंब लागत आहे. कदाचित माझ्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर हा विषय असता असता तर क्षणाचाही विलंब न करता यावर आम्ही स्वाक्षरी केली असती असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तरीही मी स्वतः मराठा समाजाच्या न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी तुमची दूत म्हणून चर्चा करणार आहे. वेळप्रसंगी केंद्र सरकारकडे सुद्धा तुमची दूत म्हणून जाईन. आपण फक्त चर्चेची तयारी ठेवावी असे आवाहन करतानाच आपल्या न्याय मागण्यांसाठी कोणीही जीवावर बेतेल अशी पावले उचलू नका असे आवाहनही त्यांनी सर्वांना केले.

यावेळी राज्याचे पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर, खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे,आ.आर.टी. देशमुख, आ.सुरेश धस, आ.भीमराव धोंडे, आ. संगीता ठोंबरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, मोहनराव जगताप, रमेश आडसकर, फुलचंद कराड, संतोष हंगे, राजेसाहेब देशमुख, तुळशीराम पवार आदी यावेळी उपस्थित होते.
••••

Leave a Reply

Your email address will not be published.