Home » माझा बीड जिल्हा » आरक्षणास पाठिंबा; महामेळावा पुढे ढकलला.

आरक्षणास पाठिंबा; महामेळावा पुढे ढकलला.

 आरक्षणास पाठिंबा; महामेळावा पुढे ढकलला. 
डोंगरचा राजा / ऑनलाईन 
शिवसैनिक उतरणार आंदोलनात – खांडे, मुळूक, जगताप 
बीड (प्रतिनिधी):- राज्यात मराठा आरक्षणावरून ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे पत्रकार परिषद घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी काल जाहीर केले. यावेळी त्यांनी या आंदोलनास सक्रिय पाठिंबा देत येत्या २९ जुलैचा शिवसेना महामेळावादेखील पुढे ढकलला असल्याची घोषणा केली.
    गेल्या काही दिवसांपासून आरक्षण मागणीसाठी राज्यभरात मराठा क्रांती आंदोलने होत आहेत. परवा गोदावरी नदी पात्रात शिवसैनिक काकासाहेब शिंदे यांनी आरक्षणाची मागणी करत जलसमाधी घेतली होती. त्यानंतर मंगळवारी राज्य बंदची हाक महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चाने दिली होती. त्यानुसार आज सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला तर काही ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या आहेत. आता या आंदोलनात शिवसेनाही सक्रिय होणार असून शिवसेनेने मराठा आरक्षणास जाहीर पाठिंबा पत्रकार परिषद घेऊन दिला आहे. शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, नवगण प्लाझा, जालना रोड येथे या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मराठा आरक्षण आंदोलनात गावस्तरापासून शिवसैनिक पक्षाच्या भूमिके प्रमाणे आंदोलन करणार असून येत्या २९ जुलैचा नियोजित मेळावा पुढे ढकलण्यात आल्याचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. काकासाहेब शिंदे हे शिवसैनिक होते, त्यांच्या दुःखात शिवसेना सहभागी असल्याची माहिती सचिन मुळूक यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली. माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करत शिवसेना एकदिलाने मराठा आंदोलनात सहभाग घेणार असल्याचे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.