Home » महाराष्ट्र माझा » तुकाराम महाराजांचा खून झाला होता.

तुकाराम महाराजांचा खून झाला होता.

तुकाराम महाराजांचा खून झाला होता.
डोंगराचा राजा/आँनलाईन
— तुकाराम महाराजांचा खून झाला होता, आव्हाडांचे वादग्रस्त विधान.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा खून झाला होता असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या फेसबुक लाइव्ह दरम्यान केले होते. यावरून वाद निर्माण झाल्यावर त्यांनी आपले वक्तव्य फेसबुकवरून हटवले. मात्र त्यांच्या या वक्तव्याचा वारकरी संप्रदायाने निषेध नोंदवला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी तुकाराम महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत. तुकाराम महाराजांबाबत असे बोलण्याचे धाडस त्यांनी केलेच कसे? त्यांच्या या वक्तव्याबाबत त्यांचा निषेध करावा तेवढा कमी आहे अशा प्रतिक्रिया वारकरी संप्रदायाने नोंदवल्या आहेत.

काय म्हटले आव्हाड?

मनु संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा श्रेष्ठ होता असे वादग्रस्त वक्तव्य काही दिवसांपूर्वी शिव प्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनी केले. त्यावर प्रतिक्रिया देताना मनुस्मृतीचे दहन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. स्त्री उपभोगाची वस्तू आहे असे म्हणणारा मनू, जात व्यवस्था घट्ट करणारा मनू होता. तो तुकाराम महाराजांपेक्षा आणि ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा श्रेष्ठ कसा आहे? संभाजी भिडे यांचे डोके फिरले आहे असे मी म्हणणारच नाही. कारण संभाजी भिडे विशिष्ट समाजाचे प्रतिनिधीत्त्व करत आहेत. महाराष्ट्राला असा घाणेरडा इतिहास सांगणाऱ्यांची गरज नाही. महाराष्ट्रात मनुचा पुनर्जन्म होऊ देणार नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले. मात्र त्याचवेळी तुकाराम महाराजांचा उल्लेख एकेरी केला. तसेच आव्हाड यांनी संत चोखा मेळा यांच्या जातीचा उल्लेख केला आहे. यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत असेही वारकरी संप्रदायाने म्हटले आहे.

तुकाराम महाराजांचा खून झाला हे वारकरी संप्रदाय कधीही मान्य करू शकत नाही. तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले हे जर कोणाला मान्य करायचे नसेल तर त्यांनी ते करू नये पण त्यांच्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे आहे. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलेली ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका नसावी असे आम्हाला वाटते आहे. मात्र आव्हाडांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणीही वारकरी संप्रदायाने केली आहे. तसेच आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधही नोंदवला आहे.
वारकरी संप्रदायाने केली माफीची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published.