वनीकरणासाठी उपयुक्त- डॉ.भापकर
डोंगराचा राजा / आँनलाईन
लोकराज्यचा वृक्ष विशेषांक वनीकरणासाठी नक्कीच उपयुक्त – डॉ.पुरूषोत्तम भापकर
औरंगाबाद, दि.09 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्यचा जुलै 2018 चा विशेषांक हा वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन यावर आधारित असून या अंकातून वृक्षांच्या वेगवेगळ्या जाती आणि त्यांचे फायदे यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. राज्यातील वनांची माहिती असलेला असा हा परिपूर्ण विशेषांक आहे. यामुळे सर्वसामान्यांना तो नक्कीच उपयोगी पडेल अशी अपेक्षा व्यक्त करुन जास्तीत जास्त नागरिकांनी हा अंक विकत घ्यावा असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांनी आज येथे केले. विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांच्या हस्ते या विशेषांकाचे प्रकाशन आज करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी संचालक (माहिती) देवेंद्र भुजबळ यांनी लोकराज्यच्या विशेषांकाची माहिती दिली. यावेळी अपर आयुक्त शिवानंद टाकसाळे, उपायुक्त वर्षा ठाकूर, महेंद्र हरपाळकर, पुरूषोत्त्म पाटोदकर,विकास हजारे, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे, प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते पोलीस उपअधीक्षक उज्ज्वला बनकर, सहायक पोलिस उपायुक्त अनिता जमादार, यांच्यासह विविध विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर उपस्थित अधिकाऱ्यांना लोकराज्यच्या प्रती भेट देण्यात आल्या.
अंकाची वैशिष्टये
या अंकात संकल्प वृक्ष लागवडीचा, एक तरी झाड लावूया, हवा सर्वांचा सहभाग, झाले अशी लावा, मिशन तेरा कोटी, लक्षपूर्तीची दिशा, नाविन्यपूर्ण आणि प्रेरणादायी, नवे उपक्रम नवी दिशा, लावा शेतजमिनीवर वृक्ष, वेगळी हरितक्रांती, पथदर्शी महाराष्ट्र, कांदळवणांचे वरदान आदी विषयांच्या या विशेषांकात समावेश करण्यात आलेला आहे. त्यासोबतच वृक्ष लागवड कोठे आणि कशी करावी याबाबत सविस्तर अशी माहिती देण्यात आली आहे. बांबु : जीवनदायी कल्पतरु हा राहुल पाटील यांच्या लेखांमध्ये बांबुवर आधारित रोजगार निर्मिती करणे, बांबुपासून वस्त्र बनविणे, आदी घटकांवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. कांदळवनांचे महत्व, माहेराची झाडी, मायेची गोडी, या लेखातून ग्रामीण भागातील वृक्ष लागवड आणि संगोपनाचा पॅटर्न याबाबत विस्तृत स्वरुपाची माहिती दिली आहे. समृध्द वने व वन्यजीव या लेखात महाराष्ट्रातील वनांचे प्रकार, प्राण्यांची-पक्षांची संख्या, सरीसृपांची संख्या, किटकांचे प्रकार, याबाबत सखोल माहिती देण्यात आली आहे. तसेच 13 कोटी वृक्ष लागवड या मोहिमेच्या विषयी विस्तृत माहिती दिली आहे. समाजातील सर्व घटकांना या मोहिमेत समाविष्ट करुन घेतले जाणार आहे.
*************