कुठे नेऊन ठेवलायं..बीड जिल्हा माझा..
डोंगराचा राजा / आँनलाईन
— बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक रुपया पीक विमा!
पिक विमा योजनेची सर्वाधिक अंमलबजावणी करणाऱ्या बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी फक्त एक रुपया मिळाला आहे. खरीप आणि रब्बी पिकाने उद्ध्वस्त झालेल्या या शेतकऱ्यांची पीक विमा कंपनीने अक्षरशः क्रूर चेष्टा केल्याचं समोर येत आहे.
बीड जिल्ह्याने गेल्या वर्षी पीक विमा योजनेची मोठी अंमलबजावणी केली. जिल्ह्यातील तब्बल ८० टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आणि ५० कोटी रुपये विमा भरला, याची दखल केंद्र सरकारने घेतली होती. बीड जिल्ह्याने केलेली अंमलबजावणी देशात सरस ठरली होती म्हणूनच जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. या घटनेचा मोठा गाजावाजा झाला, अनेकांनी या यशाचे श्रेय घेतले. मात्र, प्रत्यक्षात विमा कंपन्यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याची अक्षरशः फसवणूक करण्यात आली आहे.
हजारो शेतकऱ्यांना प्रत्येकी एक रुपया मंजूर झाल्याचे उघड झाले आहे. पीक विमा मंजूर झाल्याने शेतकरी मोठ्या आशेने बँकेत गेले तर तिथे त्यांच्या पदरात निराशा पडली. अंदाजे सव्वा दोनशे कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झाला असला तर हजारो शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. एक रुपया शेतकऱ्याच्या खात्यावर टाकून पीक विमा कंपनीने शेतकऱ्याच्या दुःखावर मीठ चोळले आहे. मंजूर झालेला एक रुपया पीक विमा उचलण्यासाठी आता बँकेचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत.
धारूर, वडवणी, केज, अंबाजोगाई, आष्टी या कमी पाऊस झालेल्या तालुक्यांवर मोठा अन्याय झाला आहे. काही तालुक्यात सरासरी एवढा पाऊस झाला होता. मात्र पावसाने ओढ दिली आणि कमी कालावधीची पिके नष्ट झाली. मात्र गाव पातळीवर प्रशासनाने पीक उतारा अहवाल म्हणजे आणेवारी ठरवताना गेल्यावर्षीचा उतारा डोळ्यासमोर ठेवला, ऑफिसमध्ये बसून आणेवारी केली असा आरोप केला जात आहे.