Home » महाराष्ट्र माझा » अंगणवाडीत निकृष्ट दर्जाचा पोषण आहार.

अंगणवाडीत निकृष्ट दर्जाचा पोषण आहार.

अंगणवाडीत निकृष्ट दर्जाचा पोषण आहार.
डोंगरचा राजा / आँनलाईन
— अंगणवाडीतील निकृष्ट दर्जाच्या पोषणाआहारामुळे हजारो बालकांचे जीव धोक्यात.
— पंकजाताईंना पोषण आहाराचा डबा भेट देणार -दिलीप भोसले.
बीड — बीड शहरासह जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये आहार पुरवठा करणार्‍या संस्थांमार्फत अत्यंत निकृष्ट दर्जाचा पोषण आहार दिला जातो. जनावरे देखील खाणार नाहीत असा पोषण आहार अंगणवाडीमधील बालकांसाठी देण्यात येत असून संबंधित आहाराची तक्रार केल्यास अंगणवाडीताईला धमक्या दिल्या जातात. यामुळे अशा संस्थांचे कंत्राट बंद करुन धमक्या देणार्‍या कंत्राटदारावर कार्यवाही करावी व बीड शहरातील नियमबाह्य अंगणवाडी सेविका भरती रद्द करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य संघर्ष सेविका, मदतनिस कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष दिलीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. या प्रकरणी महिला बालकल्याणमंत्री पंकजाताई मुंडे यांना पोषण आहाराचा डबा भेट देणार असल्याचे भोसले म्हणाले.
निवेदनात म्हटले आहे की, काही संस्था चांगल्या उत्तम दर्जाचा पोषण आहार पुरवठा करतात. मात्र ज्या संस्थांचे एसडीपीओे यांच्यासोबत लागेबांधे आहेत अशा संस्था आमचं कोणीच काही करू शकत नाही, कुणाकडेही तक्रार करा अशा आविर्भावात अंगणवाडीताईंचा अपमान करुन बालकांच्या जीवनाशी खेळत आहेत. अशा कंत्राटदारांवर गुन्हे नोंदवावे यामुळे भविष्यात बालकांच्या जीवाशी खेळण्याचा कुणीही प्रयत्न करणार नाही. निकृष्ट आहारामुळे अंगणवाडीतील मुलांची संख्या घटली आहे. आठवड्याचा वेगवेगळा मेनू असला तरी चार ते पाच दिवस फक्त खिचडी वाटप केली जाते. पोषण आहार तयार होतो त्या ठिकाणी भेट दाखवून तपासणी करण्याचे कामही महिला बालविकास अधिकार्‍यांनी कधीही केले नाही. उलट निकृष्ट काम करणार्‍यांना अभय देण्याचे काम अधिकार्‍यांनी केले. बीड शहरामध्ये अंगणवाडी सेविका भरतीमध्ये सेवा ज्येष्ठता, शैक्षणिक अर्हता डावलून भरती करण्यात आली. अंगणवाडी, मदतनिस यांना मुलाखतीस बोलावले नसून थेट भरती करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करुन दोषी आढळल्यास निलंबनाची कार्यवाही करावी तसेच अशा मस्तवाल अधिकारी व निकृष्ट आहार पुरविणार्‍या संस्था यांच्यावर महिला बालकल्याण विभागाने कार्यवाही करावी नसता पालकमंत्री पंकजाताई मुंडे जिल्ह्याच्या दौर्‍यावर आल्यानंतर त्यांना निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचा डबा भेट देऊन गांधीगिरी अांदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य संघर्ष सेविका, मदतनिस कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप भोसले यांनी दिला. यावेळी संघमित्रा शेजवळ, अनिल समुद्रे, संगीता वाघमारे, गंगासागर कासारीकर, माया खवतड, कल्याणकर राधा, सुभद्रा कांबळे, सुवर्णमाला जोशी, राणी निंबाळकर, सिंधु ढगे, अनिता मराठे, सत्यवती विडेकर, ललिता आढाणे, कविता जाधव, संगीता जाधव, राणी कळमकर, पुष्पा करपे, वनिता ढोकणे, संजिवनी ठोंबरे, प्रतिभा कावळे, मीना पत्की, धोंडुबाई तौळ, पद्मिनी शेळके, वैशाली ओव्हाळ, सुनिता गायकवाड, एन.एस.गायकवाड, उषा चव्हाण यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.