Home » ब्रेकिंग न्यूज » शाळेची सरकारकडून चौकशी – ना.तावडे

शाळेची सरकारकडून चौकशी – ना.तावडे

शाळेची सरकारकडून चौकशी – ना.तावडे
डोंगरचा राजा / आँनलाईन
कोथरुड येथील माईर्स विश्वशांती गुरुकूलमधील वादाची दखल राज्य सरकारनेही घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी पुण्यातील शिक्षण उपसंचालक एक समिती शाळेत पाठवणार असून ही समिती विद्यार्थी आणि पालकांना भेटून आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

कोथरूड येथील एमआयटी शाळेतील शुल्कवाढीविरोधात पालकांची कृती समिती आणि शाळा प्रशासन यांच्यात वाद सुरु आहे. माईर्स विश्वशांती गुरुकुल स्कूलमध्ये सायकल लावण्यासाठी भरमसाठ शुल्क आकारणी करण्यात आली असून मुलींवर ठरावीक रंगाच्या अंतर्वस्त्रांची सक्ती करण्यात आली आहे. ३० जून रोजी देण्यात आलेल्या स्कूल डायरीत याबाबत माहिती देण्यात आली असून या अटींवर पालकांनी आक्षेप घेतला होता.

मुलींनी पांढऱ्या किंवा स्कीन कलरचीच अंतर्वस्त्रे घालावीत. इतर कोणतेही रंग स्वीकारार्ह नाहीत, असे नियमावलीत म्हटले होते. मुलींच्या अंतर्वस्त्राबाबत सक्ती करताना मुलांच्या अंतर्वस्त्रांबाबत काहीही सांगण्यात आले नव्हते. याप्रकरणावरुन वाद निर्माण झाला होता. शाळा प्रशासनावर कारवाईची मागणीही जोर धरु लागली होती. याबाबत पालकांनी शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालकांकडे तक्रारी देखील केल्या होत्या.

अखेर राज्याच्या शिक्षण विभागाने या घटनेची दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी पुण्यातील शिक्षण उपसंचालक एक समिती शाळेत पाठवणार असून ही समिती विद्यार्थी आणि पालकांना भेटून आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.
.

Leave a Reply

Your email address will not be published.