डीसीसी कर्मचाऱ्यांचा हम करे सो कायदा.
डोंगरचा राजा / रविकांत उघडे
ग्राहक वैतागले :बँकेचा कारभार ढेपाळला.
माजलगाव – तालुक्यातील गंगामसला येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार सध्या कमालीचा ढेपाळला आहे. येथील कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार सुरू केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक कमालीचे वैैतागले आहेत हा मनमानी कारभार बंद करावा असी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदारांना दि.५ जुलै गुरुवार रोजी निवेदन देऊन केली आहे.
माजलगाव तहसीलदार यांना दिलेलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जिल्हा मध्यवर्ती बँक ही गोरगरिब, सर्वसामान्य, शेतकरी व शेतमजुरांची बँक आहे. या शाखेतील शाखाधिकारी व कर्मचारी मागील अनेक दिवसांपासून दिलेल्या वेळेत उपस्थित राहात नाहीत. बँकेची वेळ सकाळी १०: ३० ते सायं ५ :३० पर्यंत आहे. माञ बँक कर्मचारी त्यांच्या मनावर कधी १२ वाजता तर कधी १ वाजता येऊन मनमानी कारभार करत आहेत. परिणाम बँकेच्या कामकाजावर होताना दिसून येत आहे. बँकेत आलेल्या ग्राहकांची कामे तडकपणे निपटवून मोकळी न करता बँकेत विनाकारण गर्दी होत आहे. कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे येथील ग्राहकांची हेळसांड होत आहे. या बँकेत गंगामसला, मोठेवाडी, छोटेवाडी, रामनगर, आबेगाव, छञबोरगांव, सरवर पिंपळगाव, सोमठाणा, आडुळा, सुरूमगाव, गुंजथडी या गावातील ग्राहकांचा भरणा आहे. सध्या बोंडअळीचे अनुदान व इतर कामासाठी ग्राहक बँकेत येतात. माञ बँक दुपारी १२ व १ वाजता उघडली जात असल्याने ग्राहकांना विनाकारण ताटकळत बँकेच्या समोर बसावे लागते.
प्रशासनाने संबंधित बँक शाखाधिकारी व कर्मचारी यांना सुचना देऊन हा मनमानी कारभार बंद करावा अन्यथा संभाजी ब्रिगेड शेतकर्यांच्या स्मरणार्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल व होणार्या नुकसानीस प्रशासन जबाबदार रहील असा इशारा संभाजी ब्रिगेड जिल्हाउपाध्यक्ष रंजीत जाधव, तालुका अध्यक्ष विजय दराडे, बालाजी रेडे, सोमेश्र्वर पांचाळ, सुभाष करे, रामेश्र्वर शेळके, बालाजी खेञी, इश्वर कटके यांनी माजलगाव तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.