४७ वर्षांनंतर नागपुरात पावसाळी अधिवेशन.
डोंगराचा राजा / आँनलाईन
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवारपासून नागपूर येथे सुरू होत आहे. नागपुरात यापूर्वी तीन वेळा पावसाळी अधिवेशन झाले असले तरी १९७१ नंतर प्रथमच म्हणजे तब्बल ४७ वर्षांनंतर नागपूरला पावसाळी अधिवेशन होत आहे. नक्षलवाद्यांकडून धोका असल्याचा इशारा गुप्तवार्ता विभागाने दिल्याने विधान भवनासह संपूर्ण सिव्हिल लाइन्स भागात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सर्वत्र सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बुधवारी सुरू होत आहे. साधारणतः नागपुरात हिवाळी अधिवेशन घेतले जाते, परंतु यावेळी पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे. यापूर्वी १९६१, १९६६ व १९७१ मध्ये पावसाळी अधिवेशन नागपुरात झाले होते. १९७१ नंतर मात्र हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्याची प्रथा सुरू झाली होती ती यंदा खंडित झाली आहे. मुंबईतील मनोरा आमदार निवासाची इमारत जर्जर झाली असून ही इमारत पाडून तेथे नवीन आमदार निवास बांधण्यात येणार आहे. आमदारांच्या निवासाची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा यासाठी पावसाळी अधिवेशन नागपूरला घेणे सोयीचे होते. त्याचबरोबर आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्चऐवजी जानेवारी ते डिसेंबर असे करण्याबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. तसे झाल्यास हिवाळी अधिवेशन हेच अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असून ते मुंबईत घ्यावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी सोय म्हणून नागपूरला होणारे पावसाळी अधिवेशन कायमसाठी नागपुरात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कडेकोट बंदोबस्त, सीसी टीव्ही कॅमेऱयाची नजर!
एप्रिल महिन्यात गडचिरोली जिह्यात पोलिसांनी मोठे ऑपरेशन करून ३९ नक्षलवाद्यांना ठार केले होते. याचा बदला घेण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांकडून होण्याची शक्यता असल्याने नागपूरसह नक्षलग्रस्त भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. विधान भवन, मंत्र्यांची निवासस्थाने, आमदार निवासासह संपूर्ण सिव्हिल लाइन्स परिसरात कडेकोट बंदोबस्त असून जागोजागी सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. अधिवेशनकाळात बंदोबस्तासाठी राज्यभरातील ६२०० पोलीस अधिकारी-कर्मचारी बोलवण्यात आले असून एकटय़ा नागपूर शहरात अडीच हजार अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
प्रशासनावर ताण, पोलिसांचे हाल
पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतल्यानंतर अपुऱया वेळेत अधिवेशनाची तयारी करताना प्रशासनाची अक्षरशः तारांबळ उडाली आहे. विधान भवन, मंत्र्यांची निवासस्थाने, आमदार निवास यांची रंगरंगोटी व रस्त्यांची अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी सध्या अहोरात्र कामे सुरू आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या वेळी मंडप, राहुटय़ा टाकून सुरक्षारक्षक व कर्मचाऱयांसाठी तात्पुरते निवारे तयार केले जातात, परंतु यावेळी पावसाळा असल्याने त्यांची कुठे व कशी व्यवस्था करायची याचा मोठा प्रश्न आहे. अधिवेशनकाळात जागोजागी पोलीस तैनात करावे लागतात. त्यांच्यासाठी अद्याप निवारे तयार झालेले नाहीत. त्यामुळे पावसाची झड लागली तर त्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय असलेल्या हैदराबाद हाऊससमोरील रस्त्याचे काम अर्धवट झाले आहे. पेव्हर ब्लॉक टाकून हा रस्ता तात्पुरता का होईना तयार करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.
वेगळ्या विदर्भासाठी ४ तारखेला ‘नागपूर बंद’
नागपूर अधिवेशन आले की वेगळ्या विदर्भाची मागणी पुढे येते. या मागणीचा जोर पार ओसरला असला तरी अधिवेशनाच्या तोंडावर विझलेली चूल पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न होतो. यंदाचे अधिवेशनही त्याला अपवाद नाही. विदर्भ राज्य आंदोलन समितीने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे ४ जुलै रोजी ‘नागपूर बंद’ची हाक दिली आहे, मात्र या बंदमध्ये कोणीही प्रमुख राजकीय पक्ष यात सहभागी नसल्याने बंदला फारसा प्रतिसाद मिळण्याची शक्यता दिसत नाही.