Home » महाराष्ट्र माझा » वाकेकर स्मृती पुरस्कार उर्जास्त्रोत-आ. देशमुख.

वाकेकर स्मृती पुरस्कार उर्जास्त्रोत-आ. देशमुख.

वाकेकर स्मृती पुरस्कार उर्जास्त्रोत-आ. देशमुख.
डोंगरचा राजा / आँनलाईन
मयंक गांधी, राहुल आवारे, लक्ष्मीकांत देशमुख पुरस्काराने सन्मानीत.
परळी — पुरस्कार हा केलेल्या कामाचा योग्य सन्मान निश्चितच आहे परंतु, मारवाडी युवा मंचने ज्यांना पुरस्कार दिले आहेत त्या सर्व व्यक्तींच्या एकुण कामातून खूप काही शिकता येण्यासारखे आहे. खऱ्या अर्थाने असे पुरस्कार माझ्यासह आपल्या सर्वांसाठीच एक उर्जा असून आपणसुद्धा पुरस्कारापर्यंत पोहचवावे एवढे काम करायला हवे. सध्या दुष्काळ आणि संबंधीत कामे यावर खूप काही चर्चा होत असतांना मयंक गांधी यांनी परळीमध्ये केलेल काम पाहता त्यांनी आमच्या लातूरमध्येसुद्धा काम सुरु करावे, असे आवाहन लातूर विधानसभेचे सदस्य आ. अमित देशमुख यांनी व्यक्त केले. दरम्यान, चांगल्या कामाचे समाजाला दर्शन व्हावे ही मारवाडी युवा मंचच्या सुवालाल वाकेकर स्मृती पुरस्कारामागे भुमिका असून कार्यक्रम समाजसुधारण्यासाठी प्रेरणा देणारा आहे असे मत स्वामी विवेकानंद हॉस्पीटलचे विश्वस्त डॉ. अशोक कुकडे यांनी व्यक्त केले.
मारवाडी युवा मंच परळीच्या वतीने समाजभुषण स्व. सुवालाल वाकेकर स्मृती पुरस्कारांचे वितरण बुधवार दि. 27 जून रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून आ. अमित देशमुख तर अध्यक्ष म्हणून डॉ. अशोक कुकडे , वैद्यनाथ देवस्थानचे सचिव राजेश देशमुख उपस्थित होते. या कार्यक्रमात ग्लोबल फाऊंडेशनचे विश्वस्त मयंक गांधी (समाजभुषण), कॉमनवेल्थ गेम्स्‌मधील कुस्तीचे सुवर्णपदक विजेता मल्ल राहुल आवारे (क्रीडा भुषण) व अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख (साहित्यभुषण) यांना पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. पुरस्कारांचे वितरण आ. अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन व समाजभुषण स्व. सुवालाल वाकेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी स्वरनक्षत्र कला अकादमीचे अध्यक्ष कृष्णा बळवंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वागतगीताच्या माध्यमातून उपस्थितांचे स्वागत केले.
आपल्या भाषणात पुढे बोलतांना आ. अमित देशमुख म्हणाले की, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अभ्यास करुन पुढे जात असल्याचे पाहून मला अभिमान वाटतो. परंतु, स्वत:च्या पायावर उभे राहण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आता मुलींच्या अंगी निर्माण झाली आहे. शिकायचे आणि नंतर लग्न करुन घरदार सांभाळायचे या चौकटीपासून आणखी पुढे जाण्याचे मुलीचे स्वप्न कौतुकास्पद असल्याचे आ. देशमुख म्हणाले. दुष्काळग्रस्त हा शिक्का आपल्या मराठवाड्यावर बसला आहे. केवळ पाणी पुरवठा करायचा परंतु दुष्काळमुक्तीसाठी काहीच करायचे नाही ही भुमिका सरकारची चुकीची आहे. दुष्काळग्रस्त भागात उद्योग वाढवून रोजगार द्यावेत, शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंद्यासाठी अर्थसहाय्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. मारवाडी युवा मंचच्या या कार्यक्रमामुळे मी आज मयंक गांधी यांना भेटू शकलो. खरचं त्यांनी परळी तालुक्यात चांगले काम केले आहे. तुमचं येथील काम संपत आलयं, तुम्ही आता आमच्या लातूरला या… असे निमंत्रणही आ. अमित देशमुख यांनी दिले. गांधी यांच्या भाषणात आपण राजकारण सोडून समाजकारणात आलो याचा संदर्भ घेत हे तुम्हाला कसं जमलं? आम्हाला राजकारण सोडवतच नाही अशी प्रतिक्रीया आ. अमित देशमुख यांनी दिली आणि सभागृहात एकच हशा उमटला.
मयंक गांधी..
इंडिया अगेन्स्ट करप्शन या मोहिमेत काम करीत असतांनाच राजकारणाच्या जवळ गेलो परंतु, हे आपले काम नाही हे लक्षात आल्यानंतर बाजूला होत दुष्काळग्रस्त भागात काम सुरु केले.सर्वेक्षण केल्यानंतर बीडमधील परळी निवडून 15 गावांत काम सुरु केले. आज मुंबई नाही तर परळी माझ्यासाठी कर्मभुमी आहे असे मयंक गांधी यांनी सांगीतले. ग्रामिण भागाचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत या म. गांधींच्या विचारावर आपण काम सुरु केले असून तात्पुरत्या उपाय योजनापेक्षा कायमस्वरुपी दरडोई आर्थिक उत्पन्न वाढावे अशा अनेक उपाय योजना या 15 गावांत सुरु केल्याचे ते म्हणाले. दरम्यान, पुरस्कारासाठी काम केले नाही पण आज मला दिलेला पुरस्कार “मयंक तू आणखी काम कर’ असे सांगणारा आहे.
राहुल आवारे..
कॉमनवेल्थ गेम्स्‌ मध्ये कुस्ती जिंकल्याचा निश्चितच आनंद होता, परंतु, जेंव्हा माझ्या गळ्यात सुवर्णपदक टाकून भारताचा तिरंगा फडकला आणि राष्ट्रगीत सुरु झाले तो माझ्यासाठी कुस्तीतील विजयापेक्षा मोठा सन्मान होता असे मत प्रसिद्ध मल्ल राहुल आवारे यांनी व्यक्त केले. कुस्तीसाठी लहानपणापासून मेहनत घेत होतो, अनेक तालमीत प्रशिक्षण घेतले. बिराजदार आणि काका पवार यांनी डावपेच शिकविले म्हणूनच मी जी काही मेहनत घेतली त्याची चिज झाल्याचे मला समाधान आहे. मी भारताचा आहे आणि भविष्यात भारतासाठी आणखी खेळून बीडसह देशाचे नाव उंचावर जाईल अशी कठोर मेहनत आपण घेऊत असे राहुल आवारे म्हणाले. हा पुरस्कार मला प्रेरणा देणारा असल्याचे ते म्हणाले.
लक्ष्मीकांत देशमुख..
हल्ली समाजातून संवेदना हरवलेली दिसत असून साहित्यातून सात्वीक विचार मांडून या समाजातील दु:ख समोर ठेवण्याचा प्रयत्न आपण आपल्या अनेक पुस्तकातून केले आहे. प्रशासनात प्रदीर्घ काम केले असल्याने ग्रामिण भागातील विकासाचे चित्र कसे आहे? तेथे नेमक्या समस्या काय असतात? आणि या समस्या सोडविण्यासाठी काय करता येऊ शकतो याचा अभ्यास आपल्याला झाला. परिणामी मी माझ्या लिखानातून विकासावर भर दिल्याचे ज्येष्ठ साहित्यीक लक्ष्मीकांत देशमुख पुरस्काराला उत्तर देतांना म्हणाले. साहित्य क्षेत्रात दरवर्षी अनेक पुरस्कार मिळत असतात परंतु, मारवाडी युवा मंचने वाकेकर यांच्या नावाने दिलेला पुरस्कार हा लिखानाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी उपयुक्त ठरेल असे ते म्हणाले.
डॉ. अशोक कुकडे
समाजात विविध क्षेत्रात वेगवेगळी माणसे काम करीत असतात. सर्वांनाच व्यासपीठ आणि पुरस्कार मिळतोच असे नाही. परंतु मारवाडी युवा मंचने समाजभुषण सुवालाल वाकेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिलेला पुरस्कार म्हणजे चांगल्या कामाचे समाजाला दर्शन व्हावे या भुमिकेचा असल्याचे स्वामी विवेकानंद हॉस्पीटलचे विश्वस्त डॉ.अशोक कुकडे म्हणाले. समाजात काम करीत असतांना वेदनेसोबत आपल्याला जुळवून घ्यावे लागते. मयंक गांधी यांनी तर आपलं गाव महानगर मुंबई सोडून परळीत आले, राहुल आवारे स्वत:चे आयुष्य भारताच्या प्रतिष्ठेसाठी पणाला लावतोय तर लक्ष्मीकांत देशमुख साहित्यातून सामाजिक संवेदना जागे करीत आहेत. एकुणच ज्यांना पुरस्कार मिळाला या सर्वांनीच वेदनेसोबत आपली नाळ जोडली असून या वेदनेवर फुंकर घालण्याचे मारवाडी युवा मंच परळीने केल्याचे डॉ. अशोक कुकडे म्हणाले. आज झालेल्या कार्यक्रमात विशेष गौरव व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी व वाकेकर प्रतिष्ठानचे विजयकुमार वाकेकर यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत ओमप्रकाश सारडा, धरमचंद बडेरा, सतिश सारडा, आकाश भन्साळी, संजय लुंकड, गोविंद सोमाणी, शितल पोकर्णा, गजराज पालीवाल, रामप्रसाद शर्मा, विजय लड्डा, डॉ. प्रकाश वाकेकर यांनी केले. आभार प्रदर्शन मारवाडी युवा मंचचे सतिश सारडा तर संचलन अर्चना चव्हाण व प्रशांत जोशी यांनी केले. कार्यक्रमास विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.