Home » माझा बीड जिल्हा » ना.पंकजा मुंडेंनी घेतला मॅरेथॉन आढावा..

ना.पंकजा मुंडेंनी घेतला मॅरेथॉन आढावा..

ना.पंकजा मुंडेंनी घेतला मॅरेथॉन आढावा..
डोंगरचा राजा / आँनलाईन
– रेल्वे २०१९ रेल्वे धावणारच.
– अधिका-यांना करून दिली आखणी.

बीड दि. २१ — बीड जिल्ह्याला गेल्या तीन साडे तीन वर्षात आपण पालकमंत्री या नात्याने विकासकामांना पुरेसा निधी खेचून आणला आहे. या निधीमुळे जिल्ह्यात रस्ते,पाणी, रेल्वे,जलयुक्त शिवार, स्वछता, आरोग्य क्षेत्रात अमुलाग्र बदल झाला असून जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलला आहे .आता पुढील काळात विकासास गती देण्यासाठी त्यांनी आज अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागाचे नियोजन स्वतः करून दिले. दरम्यान, नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग २०१९ पर्यंत कसल्याही परिस्थितीत पूर्ण होणारच असा विश्वास त्यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास कामांचा खातेनिहाय मॅरेथॉन आढावा घेतला, त्यानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या.
यावेळी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे, आ. संगीताताई ठोंबरे, जिल्हाधिकारी एम .डी .सिंह ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल एडगे, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते .

पीकविमा योजनेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीत जिल्हयाचा गौरव देशात झाला. त्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांचे सर्वप्रथम अभिनंदन केले. मागच्या पाच वर्षापूर्वी बीड जिल्ह्यात एक हजार टँकर लावून पाणीपुरवठा केला जात होता .मात्र आपण सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामामुळे बीड जिल्ह्याची दुष्काळी ओळख पुसून जिल्हा टँकरमुक्त होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे आणि आज जिल्ह्यात केवळ बारा टँकर सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. आपण पालकमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर ,रस्ते पाणी ,वीज , या पायाभूत सुविधांसोबतच स्वच्छता आणि ग्रामविकासावर भर दिला. जिल्ह्यात २०१४ पर्यंत केवळ तीस टक्के लोकांकडे शौचालय होते. पण आता जिल्ह्यात तीन लाखाहून अधिक शौचालय उभारण्यात आले आहेत. यापुढील काळात जिल्ह्यातील सर्व गावात सांडपाणी निस्सारण असेल यादृष्टीने काम करण्याच्या सूचना संबंधित विभागास दिल्या व जिल्ह्यात घर तेथे शोषखड्डा करण्याचे त्यांनी सुचवले. याचबरोबर बीड जिल्हा मोतीबिंदू मुक्त करण्यास आरोग्य विभागास सूचनाही त्यांनी दिल्या . जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डिसेंबर अखेर पर्यंत मोतीबिंदू मुक्त जिल्हा करणार असल्याचे सांगत त्यादृष्टीने महाआरोग्य शिबीर आयोजित केले जाणार असून यात रुग्णांची तपासणी,आवश्यक त्या रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

जिल्हयाचे मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषद इमारतीस
ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिल्यामुळे ही इमारत सत्तर टक्के बांधून पूर्ण झाली आहे तर
बीड जिल्ह्यातील अकरा ही पंचायत समितीच्या इमारती जुन्या झाल्या होत्या . त्याही मंजूर केल्या त्यासाठी निधी दिला यातील काही इमारती पूर्ण होऊन त्यात कामकाज सुरू झाले असल्याचे त्या म्हणाल्या.

*राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने*
———————————-
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्ग होत आहेत .यातील औरंगाबाद सोलापूर महामार्गाची बीड जिल्हयातील लांबी ७८ किमी आहे व या रस्त्यासाठी आवश्यक भूसंपादन शंभर टक्के पूर्ण झाले असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच बीड शहरातील बिंदुसरा नदीवरील पूल विक्रमी कालावधीत पूर्ण करण्यात आला असून दहा जुलै पासून वाहतूकीस खुला होईल असेही त्यांनी सांगितले.

*२०१९ पर्यत रेल्वे धावणारच*
————————————
जिल्ह्याचं स्वप्न असलेल्या अहमदनगर बीड परळी रेल्वेमार्गाच्या कामाचा ही त्यांनी यावेळी आढावा घेतला. रेल्वेचे काम सध्या गतीने होत असून २०१९ पर्यंत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . या रेल्वेमार्गावर परळी आणि नगर अशा दोन्ही बाजूने काम करण्याचे आपण रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्री यांना सुचवले होते त्यानुसार आता दोन्ही बाजूने काम गतीने सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. रेल्वेला १३४३ हेक्टर जमीन संपादन करून देण्यात आली आहे ,त्यासाठी ३७६ कोटी मावेजा देण्यात आला.आता उर्वरित २०१ हेक्टर जमीन भूसंपादन बाबत जिल्हाधिकारी, खासदार प्रीतमताई आणि आपण स्वतः जमीन मालकाशी संवाद साधून हा पुढच्या पिढीच विकासाचे स्वप्न पूर्ण करू .या मार्गावर रेल्वे रूळ अंथरण्याचे काम आष्टी तालुक्यात सुरू आहे . या मार्गाच्या चाचणीसाठी रेल्वे इंजिन उपलब्ध होण्यासाठी खासदार प्रीतमताई आणि आपण बोलणार असल्याचे पालकमंत्री पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

*अवैध धंद्याविरूध्द मोहीम उघडण्याचे पोलिस प्रशासनाला आदेश*
———————————
बीड जिल्ह्यात पंधरा ऑगस्ट पर्यंत पोलीस प्रशासनाने अवैध धंद्याविरोधात मोहीम राबवावी व जिल्ह्यात सुरू असलेलेअवैध दारू, मटका यासांरखे धंदे उखडून फेका असे आदेश यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले .जिल्ह्यातील अवैध धंद्यामुळे तरुणाई चुकीच्या मार्गावर नेण्याचे काम होत आहे .त्यामुळे अशा धंद्यांना आश्रय मिळता कामा नये असे सक्त आदेश त्यांनी पोलिसांना दिले. व प्रसंगी या अवैध धंद्याविरोधात सुरू करण्यात येणाऱ्या मोहिमेत आपण पालकमंत्री म्हणून लक्ष ठेवून असणार आहोत व मी ही मला मिळालेल्या माहितीवर एखाद्या ठिकाणी मी स्वतः अवैध धंद्याविरोधात उघडलेल्या धाडीत सहभागी होईन असे पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

*नियोजनाची करून दिली आखणी*
———————————
जिल्ह्यातील वीज,पाणीपुरवठा, जिल्हा परिषदेचे विभाग यासारख्या विभागांना गती देण्याचे आदेश त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले .या विभागाच्या विकासासाठी संबंधित विभागांनी आराखडे तयार करावेत. त्यांना रेड झोन ,ग्रीन झोन ,यलो झोन ठरवून त्यानुसार मागे पडलेल्या विभागासाठी जिल्हा नियोजन ,राज्य सरकार आणि केंद्राच्या योजनेतून निधी आणून ते विभाग विकास प्रक्रियेत पुढे आणावेत यासाठी तपशील निहाय नियोजन करण्याचे आदेश ही त्यांनी दिले. जिल्ह्यात यावर्षी रेकॉर्डब्रेक ऊस लागवड झाली आहे. प्रत्येक शेतकऱ्याचा ऊस गाळला जाण्यासाठी आजारी कारखाने भाडे तत्वावर देऊन गाळप करण्यासंदर्भात राज्य सरकार कडे प्रयत्न सुरू असल्याचेही पालकमंत्री पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या.
••••

Leave a Reply

Your email address will not be published.