Home » माझा बीड जिल्हा » महिला बालकल्याण विभागाच्या निष्क्रियतेचा दुसरा बळी – भोसले

महिला बालकल्याण विभागाच्या निष्क्रियतेचा दुसरा बळी – भोसले

महिला बालकल्याण विभागाच्या निष्क्रियतेचा दुसरा बळी – भोसले
डोंगरचा राजा / आँनलाईन
– पीडित कुटुंबाला पाच लाखांची मदत देण्याची मागणी
बीड — वर्षभरापासून वेळेवर मानधन मिळत नाही. रजिस्ट्रर घ्यायल पैसे नाहीत. वरिष्ठांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक यामुळे परभणी जिल्ह्यातील सुरेखा राखुडे या अंगणवाडी सेविकेने  यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. अशाच परिस्थितीमुळे गेवराई तालुक्यातील गुंतेगाव येथील अंगणवाडी मदतनिस निता भागवत शिंदे यांनी केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केली. याला महिला बालकल्याण विभाग व शासनाकडून मिळणारे तुटपुंजे मानधन जबाबदार आहे. यामुळे सदरील अंगणवाडीताईच्या पीडित कुटुंबियांना पाच लाखांची मदत द्यावी व संबंधित अधिकार्‍यांना गुन्हे दाखल करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य संघर्ष अंगणवाडी सेविका मदतनिस कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष  दिलीप भोसले यांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनात केली आहे.
अंगणवाडी कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत घ्या या मागणीसाठी संघटनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलन मोर्चे काढण्यात आले. परंतु सरकारला याचे गांभिर्य नाही. अगोदरच अंगणवाडीताईंना तुटपुंजे मानधन मिळते. त्यातच वरिष्ठांकडून वेळोवेळी मिळणार्‍या अपमानास्पद वागणुकीमुळे अंगणवाडीताईचे मनोबल खचत आहे. वारंवार होणारा अपमान व दारिद्र्यामुळे परभणी येथे  सुरेखा राखुडे या अंगणवाडी ताईने आत्महत्या केली. ही घटना होतच नाही तोच गेवराई तालुक्यातील गुंतेगाव येथील अंगणवाडी मदतनिस निता भागवत शिंदे यांनी याच कारणामुळे केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केली. राज्यातील ही दुसरी घटना आहे. महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे या प्रकरणाची दखल घेणार का तसेच पीडित  कुटुंबाला आर्थिक मदत व भेटण्याचा मोठेपणा दाखवणार का? असा प्रश्न भोसले यांनी केला. यामुळे सदरील पीडित कुटुंबाला पाच लाखांची मदत करावी व संबंधित अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत नसता महिला बालकल्याणमंत्र्यांविरुध्द आंदोलन करुन अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष दिलीप भोसले, अनिल समुद्रे, संघमित्रा शेजवळ, माया खवतड, कल्याणकर राधा, सुभद्रा कांबळे,  सुवर्णमाला जोशी, राणी निंबाळकर, सिंधु ढगे, अनिता मराठे, सत्यवती विडेकर, ललिता आढाणे, कविता जाधव, लता मस्के, संगीता जाधव, स्वप्ना वाघमारे, राणी करमाळकर, पुष्पा करपे, वनिता ढोकणे, संजिवनी ठोंबरे, प्रतिभा कावळे, मीना पत्की यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.