Home » देश-विदेश » सरकारचा दंगल घडवण्याचा प्रयत्न हाणून पाडा -अ‍ॅड.आंबेडकर

सरकारचा दंगल घडवण्याचा प्रयत्न हाणून पाडा -अ‍ॅड.आंबेडकर

सरकारचा दंगल घडवण्याचा प्रयत्न हाणून पाडा -अ‍ॅड.आंबेडकर
डोंगरचा राजा / आँनलाईन
एका बाजूला संविधान आणि दुसऱ्या बाजूला मनुवाद, आरक्षणवादी आणि आरक्षणविरोधी अशी आताची लढाई आहे. दंगली घडवणे हाच सरकारचा प्रयत्न असून व्यवस्था कोलमडल्याचा आभास निर्माण केला जाईल. तसेच आणिबाणीशिवाय पर्याय नसून निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्नही केला जाईल. त्यामुळे सरकारचा दंगल घडवण्याचा प्रयत्न हाणून पाडा, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी जनतेला केले.

भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या वतीने आयोजित सातव्या पंचवार्षिक अधिवेशनात आंबेडकर बोलत होते. छत्रपती शाहू महाराज, आयोजक लक्ष्मण माने, माजी आमदार विजय मोरे, शारदा खोमणे, बाबुराव धोत्रे या वेळी उपस्थित होते. विद्यमान सरकार, आगामी निवडणुकांमधील बहुजन समाजाची मोटबांधणी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे संघाच्या व्यासपीठावर जाणे यांबाबत त्यांनी भाष्य केले.

आंबेडकर म्हणाले, समाजात जाणीवपूर्वक अस्वस्थता निर्माण करण्याचा सरकारकडून प्रयत्न होत आहे. मध्य प्रदेशात ५१ ठिकाणी संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आरक्षण संपवण्यासाठी यज्ञ केले जात असून त्यांच्यावर सरकार कारवाई करत नाही. विद्यमान संसदेला घटना बदलण्याएवढे बहुमत नसल्याने अशाप्रकारे वातावरण तापविण्यात येत आहे. आरक्षणविरोध करून दंगल घडवण्याचा कितीही प्रयत्न केला. तरी देखील जनतेने हा प्रयत्न हाणून पाडावा. आमच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार झालेला नाही, अशी छबी घेऊन हे सरकार फिरत आहे. परंतु, आपल्या कपडय़ावर किती चिखल उडाला आहे, हे येत्या पंधरा दिवसांत दिसेल, असे सूचक वक्तव्य त्यांनी या वेळी केले. तसेच येत्या १३ जून रोजी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन चालू परिस्थिीवर भाष्य करेन.

घटना आणि लष्कराबद्दल विसंगत विधाने करणाऱ्या संघाला त्यांच्याच व्यासपीठावर जाऊन माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ठणकावले नाही. घटनेमुळेच राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेले प्रणव मुखर्जी घटना बदलण्याची वक्तव्ये करणाऱ्या संघाच्या व्यासपीठावर गेले. त्यामुळे ते काँग्रेसच्या विचारांना विसरले, अशी टीका आंबेडकर यांनी मुखर्जी यांच्यावर या वेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.