Home » राजकारण » राष्ट्रवादीचे रविवारी पुण्यात शक्तिप्रदर्शन.

राष्ट्रवादीचे रविवारी पुण्यात शक्तिप्रदर्शन.

राष्ट्रवादीचे रविवारी पुण्यात शक्तिप्रदर्शन.
डोंगरचा राजा / आँनलाईन
— काँग्रेसची मतदारसंघनिहाय बैठक.

पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीची काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरू केली असून, त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादीच्या वतीने २०व्या वर्धापनदिनीचे औचित्य साधून रविवारी पुण्यात शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याच वेळी काँग्रेस नेत्यांच्या शनिवारी होणाऱ्या बैठकीत मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीचा रविवारी वर्धापन दिन असून, पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात पक्षाने पश्चिम महाराष्ट्रात हल्लाबोल आंदोलन केले होते. त्याची सांगता आणि पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादीने सध्या पश्चिम महाराष्ट्र या एकेकाळच्या बालेकिल्ल्यावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या महिन्यात हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून पक्षाने पश्चिम महाराष्ट्रात वातावरणनिर्मिती केली होती. पश्चिम महाराष्ट्रात जास्त जागा जिंकण्याचे राष्ट्रवादीचे उद्दिष्ट आहे. त्यातूनच या भागावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष केंद्रित केले आहे. रविवारी होणाऱ्या मेळाव्याला ५० हजारांपेक्षा जास्त उपस्थिती असेल, असे सांगण्यात येत आहे.

काँग्रेस अजून सुस्त

राष्ट्रवादीने निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली असतानाच काँग्रेसच्या पातळीवर अजून शांतताच आहे. उद्या प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्यातील काही निवडक नेत्यांची बैठक बोलाविली असून त्यात राष्ट्रवादीबरोबरील आघाडी आणि मतदारसंघनिहाय आढावा यावर चर्चा करण्यात येईल. राष्ट्रवादीबरोबर आघाडी करताना कोणते मतदारसंघ मित्र पक्षाला सोडता येतील किंवा आघाडीच्या बोलणीत कोणती भूमिका घ्यायची यावर चर्चा करण्यात येईल. राष्ट्रवादीने राज्यात ठिकठिकाणी सभा, बैठकांचा जोर लावला आहे. या तुलनेत काँग्रेसने अजून जोर लावलेला नाही. राष्ट्रवादीत स्वत: शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आदी विविध नेत्यांचे दौरे सुरू आहेत. काँग्रेसमध्ये अजून शांतता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.