बियाणे खरेदीच्या पावत्या घ्या – अँड.देशमुख.
डोंगरचा राजा / आँनलाईन
बीड — अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजर पेरणीकडे वळत आहेत. बि – बियाणे, खत आणि औषधी खरेदी करताना शेतकऱ्यांनी फसू नये. या सर्व वस्तू खरेदी करताना कृषी बियाणे विकणाऱ्या अधिकृत दुकानातूनच माल खरेदी करावा. दुकानदार ओळखीचा किंवा नातेवाईक असला तरी त्याच्याकडून अधिकृत पावती सर्व बाबी नमूद करून घ्यावी. नंतरच माल खरेदी करावा. शेतकऱ्यांनी फसू नये आणि दुकानदारांनी शेतकऱ्यांना फसवू नये, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.
बोगस बियाणे पेरणी काळात धुमाकूळ घालते. गेल्या वर्षी अशा प्रकारचे बोगस बियाणे असलेल्या जवळपास चारशे वाणांचे परवाने रद्द झाले होते. यावरून शेतकऱ्यांची फसवणूक होत असते, हे सिद्ध झाले आहे. हजारो रुपये खर्च करून शेतकरी बियाणे खरेदी करतो. मात्र बोगस बियाणे निघाले की, शेती उत्पन्न देत नाही.
ग्राहक या नात्याने शेतकऱ्याचा दुकानदाराकडून पावती घेण्याचा हक्क आहे. त्याचप्रमाणे अधिकृत पावती देण्याचे दुकानदाराचे कर्तव्य आहे. पावत्या देण्याचे त्याच्यावर बंधन आहे.
या पावत्यांवर दुकानाचे नाव आणि पत्ता, दुकानाचा नोंदणी क्रमांक, जीएसटी आणि सीएसटी क्रमांक, खरेदी केलेल्या बियाण्याचे नाव, उत्पादक कंपनीचे नाव, वाणांचे नाव, बियाण्यांची मुदत या व इतर सर्व बाबी पावतीत स्पष्ट नमूद करून त्या त्या बियाण्यांच्या किमती त्या पावतीत लिहून पूर्ण मजकुरासह पावती घेतली पाहिजे.
कधी कधी बियाण्यांची उगवण क्षमता कमी असते तर कधी बोगस बियाणे उत्पादन देत नाही. जर असे झाले आणि फसवणूक झाली तर शेतकऱ्याला तक्रार करून न्याय मागण्याचा अधिकार आहे. मात्र ही तक्रार करताना तक्रारींसोबत बियाणे खरेदी केल्याची पावती जोडावी लागते. अधिकृत पावती नसली की अडचणी निर्माण होतात. आणि न्यायही मिळत नाही.
बियाणे बोगस निघाले, त्यात रोग प्रतिकार शक्ती नसली, ते उगवले नाही, उगवण क्षमता कमी असली, त्याला माल लागला नाही तर शेतकऱ्याला त्याची विमा कंपनी, महसूल आणि कृषी विभागाकडे तक्रार करता येते. या बाबी सिद्ध झाल्या तर त्याला नुकसान भरपाईही मिळते. म्हणून शेतकऱ्याने ग्राहक या नात्याने जागरूक राहून अधिकृत पावत्या घ्याव्यात, असे आवाहन अँड. देशमुख यांनी केले आहे.
