Home » माझा बीड जिल्हा » जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी.

जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी.

जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी.
डोंगरचा राजा / आँनलाईन.
– तीन महसूल मंडळात अतिवृष्टी.

बीड – मान्सूनचे आगमन होण्यास आणखी दोन दिवसांचा अवधी असतानाच मंगळवारी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास जिल्ह्याच्या काही भागात वीजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार एन्ट्री केली.या पहिल्याच मोठ्या पावसादरम्यान माजलगाव आणि अंबाजोगाई तालुक्यातील 3 महसुल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या महसूल मंडळात एका रात्रीत 63 मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.मुसळधार पावसामुळे उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आता खरीपाच्या तयारीलाही वेग येणार आहे. पहिल्याच पावसात अतिवृष्टीसारखी स्थिती निर्माण झाल्याने यंदा पाऊस कसा होईल याची प्रचिती येवू लागली आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगाव आणि अंबाजोगाई तालुक्यात मध्यरात्री जोरदार पर्जनवृष्टी झाली आहे. या माजलगाव महसूल मंडळात 70 मि.मी.पाऊसाची नोंद झाली आहे तर अंबाजोगाई महसूल मंडळात 70 मि.मी. तसेच याच तालुक्यातील लोखंडी सावरगाव महसूल मंडळात तब्बल 77 मि.मी.पाऊसाची नोंद झाली आहे. 63 मि.मी.पेक्षा जास्त होणारा पाऊस अतिवृष्टी मानला जातो. याशिवाय परळी महसूल मंडळातही 42 मि.मी. माजलगाव तालुक्यातील गंगामसला महसूल मंडळात 40 मि.मी. तर दिंद्रुड महसूल मंडळांतही 63 मि.मी.पाऊस झाल्याची नोंद पर्जन्यमापकावर झाली आहे.

दरम्यान परळीत पहिल्याच पावसात महावितरण कंपनीचे पितळ उघडे पडले आहे. पावसादरम्यान पहाटे 2 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत झाला होता. महत्वाचे हे की, गत आठवड्यात दिवसभर वीजपुरवठा बंद ठेवून मोठा गाजावाजा करत पावसाळा पूर्व वीज दुरुस्तीची कामे करण्यात आली होती, मात्र तरीही वीज गुल झाल्याने नागरिकांचे हाल झाले.तिकडे माजलगाव तालुक्यातही मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान या पावसामुळे बळीराजा सुखावला असून तालुक्यातील ग्रामीण भागातील नद्या,नाल्या वाहू लागल्याचे चित्र दिसून आले. जिल्ह्यात माजलगाव-परळी-अंबाजोगाई तालुक्यासह इतरत्रही कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे.

तालुकानिहाय पाऊस:-
बीड- 7.3 मि.मी.
पाटोदा-5.5,
गेवराई-3.3,
अंबाजोगाई-34.2,
माजलगाव-37.3,
केज-17.1,
धारुर-25 ,
परळी 12.08 मिमी.
———–

Leave a Reply

Your email address will not be published.