आरोग्यमंत्री डॉ.सावंत यांचा राजीनामा ?
डोंगरचा राजा /आँनलाईन.
— मुख्यमंत्री म्हणतात थांबा.
विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीकरिता शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी राजीनामा दिला आहे. मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेत त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. मंत्रिपद सोडावे लागणारे सावंत हे पहिलेच मंत्री ठरण्याची शक्यता आहे. शिवसेनेने स्थानीय लोकाधिकार समितीचे विलास पोतनीस यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दीपक सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता त्यांनी राजीनामा थांबवण्यास सांगितल्याचं कळत आहे.
आरोग्यमंत्री म्हणून दीपक सावंत यांच्या कार्यपद्धतीबद्दल बरीच टीका झाली होती. शिवसेनेच्या आमदारांनीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सावंत यांच्याविरोधात तक्रारींची पाढा लावला होता. आरोग्य खाते भूषविण्यात अपयशी ठरलेल्या डॉ. सावंत यांना अखेर शिवसेनेने उमेदवारी नाकारली. सावंत यांच्या कार्यपद्धतीवर उद्धव ठाकरे हेसुद्धा फारसे खूश नव्हते.
मुंबई पदवीधर मतदारसंघाचे दोनदा प्रतिनिधित्व केलेल्या सावंत यांच्याऐवजी शिवसेनेने विलास पोतनीस यांना उमेदवारी जाहीर केली आहे. स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस असलेल्या पोतनीस यांनी शिवसेनेच्या अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. मराठी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.
सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पुढील विधान परिषदेची निवडणूक आपण लढणार नसल्याचे व मंत्रिपदाचा राजीनामा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिल्याचे सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री यांनी मात्र त्यांना राजीनामा थांबवण्याचा सल्ला दिला आहे अशी माहिती मिळत आहे. याशिवाय त्यांना कॅबिनेट बैठकीलाही हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.
.