Home » ब्रेकिंग न्यूज » साहेब म्हणजे राजकारणातील ‘वीज’ – ना.मुंडे

साहेब म्हणजे राजकारणातील ‘वीज’ – ना.मुंडे

साहेब म्हणजे राजकारणातील ‘वीज’ – ना.मुंडे
डोंगरचा राजा / आँनलाईन
-भेंडेवाडी,मुंडेवाडीत लोकनेत्याच्या पुतळ्याचे अनावरण.
– ग्रामस्थांनी केली 10 लाख रुपये लोक वर्गणी.
मुखेड — मुंडे साहेब म्हणजे काय? कोणी म्हणेल ते भाजपचे नेते होते, कोणी म्हणेल ते बहूजनांचे नेते होते पण खरं तर ते राजकारणातील ‘ वीज ‘ होते, जी वीज सर्व सामान्य गोरगरिबांच्या स्वप्नात, त्यांच्या ह्रदयात चमकल्यामुळे त्यांच्या अंधारातील डोळ्यांना उजेड दिसला, मोठी स्वप्ने दिसली आणि त्यामुळेच मुंडे साहेब या नावांत ताकद होती असे भावोद्गार राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी काढले.

मुखेड-कंधार मतदारसंघातील भेंडेवाडी येथे ग्रामस्थांनी दहा लाख रुपये लोकवर्गणी जमा करून उभारलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते व अलोट जनसागराच्या साक्षीने मोठ्या उत्साही वातावरणात काल संपन्न झाले त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गोविंदराव केंद्रे तर व्यासपीठावर आ. तुषार राठोड, ह.भ.प. राधाताई सानप, तुकाराम शास्त्री मुंडे, आ. प्रताप पाटील चिखलीकर, आ. सुधाकर भालेराव, भास्करराव पाटील खतगांवकर, बीड जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, भाजपचे जिल्हाध्यक्ष राम पाटील, मुक्तेश्वर धोंडगे आदी उपस्थित होते.

कुठलाही राजकीय वारसा, सत्ता संपत्ती नसताना केवळ स्वकर्तृत्वावर सामान्य माणसाला मुंडे साहेबांनी सत्ता मिळवून दिली. मुठभर लोकांचा पक्ष वाडी, वस्ती, तांड्यापर्यंत वाढवला. त्यांच्याकडे राजकीय दूरदृष्टी होती म्हणूनच त्यांनी महायुतीची मोट बांधल्यामुळे आज आपण सत्तेत आहोत. सर्व सामान्यांसाठी आयुष्यभर संघर्ष करत तुम्हाला त्यांनी स्वाभिमानाने जगायला शिकवले, कुणाच्या दारात पाठवले नाही असे सांगून ना.पंकजाताई मुंडे यांनी माझ्यात तुम्हाला साहेब दिसत असले तरी मला ते तुमच्या डोळ्यात दिसतात असे म्हणताच टाळ्यांचा प्रचंड झाला.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी माझ्यासाठी धनसंपत्ती नाही तर एवढी मोठी जनसंपत्ती ठेवली आहे त्यात मला वाढ करावी लागेल. तुम्ही त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं, त्यांचं नेतृत्व तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, त्यांच्यासारखं प्रेम राजकारणात कोणालाच लाभले नाही, हे प्रेम माझ्यासाठी मोठी जबाबदारी असून आयुष्याची शिदोरी आहे, त्यामुळे भविष्यात मुंडेंच्या या लेकीकडून अभिमान वाटेल असेच काम होईल असे त्या म्हणाल्या. तुमचं मन खूप मोठं आहे, लोकवर्गणी करून तुम्ही पुतळा उभारला. हे माझ्या डोक्यावर कर्ज आहे, प्रेमाच्या या ऋणातून मुक्त होणे कदापि शक्य नाही पण तुमच्या विकासात कुठेही कमी पडणार नाही. सत्तेत आलेय ते कोणत्या पदावर विराजमान होण्यासाठी नाही तर तुमच्या मनावर माझं नाव कोरलं जावं यासाठी आलेय. साहेबांनी दिलेला शब्द पूर्ण करून जीवनभर तुम्हाला कधी अंतर पडू देणार नाही, माझी सत्ता ही तुमची आहे, तुम्हाला चांगले दिवस आणणं हे माझं कर्तव्य आहे असा शब्द त्यांनी यावेळी दिला.

*तुमचे प्रेमच मला संकटातून तारेल*
———————————
तोडपाणीचे राजकारण करणारे कांही नेते माझ्यावर दररोज कांही ना कांही आरोप करतात. मला घेरण्याचा त्यांचा प्रयत्न तुमच्या प्रेमामुळे कधीही यशस्वी होणार नाही उतावीळ नवरा, गुडघ्याला बाशिंग असं राजकारण माझं नाही असे ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या. रामायणात रामाला मदत करणा-या बिभीषणाला आजही समाज मान्य करत नाही कारण तो ‘घर का भेदी’ होता असे त्या म्हणाल्या.

यावेळी गोविंदराव केंद्रे, राधाताई सानप, भास्करराव खतगांवकर यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ. राठोड यांनी केले.

*क्षणचित्रं*
————
• भेंडेवाडीत येण्यापूर्वी ना. पंकजाताई मुंडे यांनी मुंडेवाडी येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. याठिकाणी त्यांचे ग्रामस्थांनी वाजत गाजत स्वागत केले.
• भेंडेवाडीत आगमन होताच गावक-यांनी मिरवणूक काढून फटाक्यांच्या आतिषबाजीत लाडक्या लेकीचे स्वागत केले.
• लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्यास भला मोठा पुष्पहार अर्पण करून अनावरण करण्यात आले.
• कार्यक्रमाच्या सुरवातीला भाजपचे ज्येष्ठ नेते पांडूरंग फुंडकर यांना दोन मिनीटं स्तब्ध उभा राहून श्रध्दांजली वाहण्यात आली.
•भेंडेवाडीच्या सरपंच चंद्रभागा जायभाये, पं. स. उपसभापती भीवराव जायभाये यांनी ग्रामस्थांच्या वतीने ना. पंकजाताई मुंडे जोरदार स्वागत केले.
• कार्यक्रमाला बंजारा समाजाच्या महिलांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
• भावी पिढीला उर्जा मिळावी यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आल्याचे राधाताई सानप आपल्या भाषणात तर पंकजाताईच्या रूपाने साहेब आजही जिवंत असल्याचे गोविंदराव केंद्रे म्हणाले
• मुंडे साहेब अमर रहे, पंकजाताई आगे बढो हम तुम्हारे साथ है या घोषणांनी उपस्थितांनी परिसर दणाणून सोडला होता
• तरूणाईचा प्रचंड उत्साह ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाला न भूतो न भविष्यति असा जनसागर लोटला होता.
••••••

Leave a Reply

Your email address will not be published.