Home » ब्रेकिंग न्यूज » मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी व्यापार्‍याची आत्महत्या!

मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी व्यापार्‍याची आत्महत्या!

मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी व्यापार्‍याची आत्महत्या!
डोंगरचा राजा / आँनलाईन
एकीकडे शेतकरी संपावर आहेत, त्यांच्या मागच्या विवंचना थांबत नाहीत. अनेकांनी तर आपले आयुष्य संपवले आहे. शेतकऱ्यांची ही अवस्था असताना आडत व्यापाऱ्यानेही मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कारभाराला दोषी ठरवत उस्मानाबादच्या कळंब तालुक्यातील तरूण आडत व्यापार्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दत्तात्रय दादाराव गुंड असे या आडत व्यापाऱ्याचे नाव आहे.

शेतकर्‍यांपाठोपाठ शासकीय धोरणांमुळे कर्जबाजारी झालेल्या आडत व्यापार्‍याने आत्महत्या केल्यामुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. थेट मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहून व्यापार्‍याने आत्महत्या केल्याची राज्यातील ही पहिली घटना आहे. काही वेळापूर्वीच केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी शेतकऱ्यांचा संप हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हणत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले होते. या वक्तव्यानंतर काही वेळातच आडत व्यापाऱ्याच्या आत्महत्येची घटनाही समोर आली आहे.

चिठ्ठीत काय लिहिले आहे?

या चिठ्ठीत गुंड यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दुषणे देत गंभीर आरोप केले आहेत. सगळे व्यापारी आणि शेतकरी तुम्हाला चोर दिसतात. म्हणून तर त्या दोघांत भांडणे लावून आपण पाहात बसला आहात. आतापर्यंत व्यापार्‍यांनीच तारल्यमुळे शेतकरी जिवंत होता. नुकतीच कुठे आमची बरी सुरुवात झाली होती. मात्र तुमच्या सरकारी धोरणाने व दुष्काळाने ते संपविले आहे. आपल्या धोरणामुळे हा शेतकरी कायमचा संपावर जात आहे. आणखी कितीजण याच वाटेने जाणार, याची वाट पाहू नका. निर्णयात बदल करून शेतकरी आणि व्यापारी दोन्ही जगवा, असेही गुंड यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

या चिठ्ठीत कुटुंबीयांची अत्यंत भावनिक शब्दांत माफी मागून त्यांनी, आपल्या लहान मुलांना दूर करू नका, असे भावनिक आवाहन केले आहे. शासनाची धोरणे, खासगी कर्ज आणि त्याच्या व्याजाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. कुटुंबीयांना त्रास करू नये, असेही दत्तात्रय गुंड यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे.

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सधन असताना डोक्यावर वाढलेला कर्जाचा ताण आणि शासनाच्या धोरणाचा फटका आपल्या मुलाला अशा वाईट निर्णयापर्यंत घेऊन गेला, याचे दुःख सरपंच असलेल्या त्यांच्या आईला लपविता आले नाही. या व्यापारी शेतकर्‍याच्या पाठीशी पत्नी, दोन मुले आहेत. या प्रकरणातील सावकार शोधून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी गुंड यांच्या कुटुंबियांनी केली आहे.

मागील वर्षी ६ हजार रूपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केलेला ८०० क्वींटल हरभरा पडून आहे. शासनाच्या धोरणामुळे दरामध्ये सातत्याने घसरण होत आहे. हमीभाव, कर्जमाफी, फुकट बियाणे, शेततळे अशा घोषणांमुळे तर शेतकरी कर्जाच्या खाईत लोटले आहेत. ही सगळी व्यथा असतानाच आता दत्तात्रय गुंड या ३२ वर्षीय आडत व्यापाऱ्याने आयुष्य संपवले आहे. हमीभाव, कर्जमाफी, फुकट बियाणे, शेततळे अशा घोषणामुळे शेतकरी बुडाला असल्याचा आरोप करीत मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहून त्याने आपली जीवनयात्रा संपविली आहे.
.

Leave a Reply

Your email address will not be published.