कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडावा – खा.डाॅ.मुंडे.
डोंगरचा राजा / आँनलाईन.
भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला तयारीचा आढावा.
गोपीनाथ गडावरील कार्यक्रम परंपरेनुसार नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडावा – खा. डाॅ. प्रितमताई मुंडे.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यस्मरणानिमित्त 3 जुन रोजी गोपीनाथ गडावर भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून हा कार्यक्रम परंपरेनुसार शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने साजरा करावयाचा आहे यासाठी सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी आज बोलताना केले.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृती दिनानिमीत्त येत्या 3 जुन रोजी गोपीनाथ गडावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी यशश्री निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी बोलताना खा. डॉ. प्रितमताई मुंडे म्हणाल्या की, मुंडे साहेबांचा स्मृतिदिन हा उत्थान दिवस म्हणुन आपण साजरा करतो. परंपरेनुसार हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने संपन्न करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. कार्यक्रमासाठी राज्याच्या विविध भागांतून साहेबांवर प्रेम करणारे लोक येतात, अगदी पंढरपूरला वारीला जातात त्याप्रमाणे दिंड्या, पताका घेऊन मुंडेभक्त येतात त्या सर्वांची व्यवस्था चोखपणे व्हायला हवी. तसेच कार्यक्रमाला येणार्या सर्वांना पाणी आणि जेवण व्यवस्थित मिळावे यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत असे सांगून त्या म्हणाल्या की, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री उमा भारती, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार उदयनराजे भोसले हे साहेबांवर प्रेम करणारे मान्यवर येणार आहेत. त्यामुळे कार्यक्रम वेगळी छाप पाडणारा झाला पाहिजे यासाठी सर्वानी एकदिलाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीला भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष नेताजी देशमुख, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, जेष्ठ नेते दत्ताप्पा ईटके गुरूजी, विकासराव डुबे, नामदेवराव अघाव, रामेश्वर मुंडे, गौतमबापू नागरगोजे, जिवराज ढाकणे, सतीश मुंडे, सुधाकर पौळ, भीमराव मुंडे, डॉ. शालिनीताई कराड, धम्मानंद मुंडे, भास्कर रोडे, वैजनाथ जगतकर, तुळशीराम पवार, श्रीहरी मुंडे, गणेश कराड, ज्ञानोबा माऊली फड, राजेश गिते, उमेश खाडे, रवी कांदे आदींसह भाजपच्या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.