Home » क्राईम स्टोरी » लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश.

लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश.

लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश.

डोंगरचा राजा / आँनलाईन
▪ अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या विशेष पथकाची कामगिरी

बीड – रस्त्यात वाहने अडवून लुटमार करण्याच्या घटना केज, युसुफ वडगाव, सिरसाळा, अंबाजोगाई हद्दीत मागील काही महिन्यात घडल्या होत्या. मात्र, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या विशेष पथकाला या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश आले असून दोघा चोरट्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहे.

याबाबत अधिक माहित अशी कि, दि. २६ मार्च रोजी केज येथील ट्रॅव्हल्स एजंट शेख अमजद शेख अहमद हे धारूरहून केजकडे जात असताना तांबवा पाटीजवळ त्यांच्या कारला मोटारसायकल आडवी लावून अनोळखी चौघांनी त्यांच्याच गाडीतून अपहरण केले आणि आधी पाच लाख आणि नंतर तडजोडीत एक लाख रुपयांची खंडणी मागितली होती. यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे शेख मजद यांचा जीव वाचला होता मात्र अपहरणकर्ते पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. त्यांनतर दि. ३ एप्रिल रोजी अतुल सुंदरराव देशमुख यांना केजहून बोरी सावरगावकडे जाताना तिघांनी त्यांना रस्त्यात धक्का देऊन पाडले होते आणि रोख ६ हजार, मोबाईल आणि गाडी घेऊन पसार झाले होते. दि. ६ एप्रिल रोजी नवनाथ त्रिभुवन हे कावळ्याची वाडी फाटा येथे थांबले असताना तिघांनी त्यांना सिरसाळा येथे सोडण्याच्या बहाण्याने रेवली शिवारात नेऊन चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील दोन मोबाईल आणि एटीएम कार्ड काढून घेतले. नंतर त्यांनी एटीएम मधून ९,५०० रुपये काढून घेतले. तसेच सिरसाळा येथे अश्याच पद्धतीने लुटमारीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला होता तर तर अंबाजोगाई येथून मोटारसायकल चोरीची घटना घडली होती. सततच्या लुटमारीच्या घटनांची अपर पोलीस अधीक्षक यांनी अतिशय गांभीर्याने दखल घेतली आणि गुन्ह्यांच्या शोधासाठी एक विशेष पथक नेमले. या पथकाने गुन्ह्यांचे बारकाईने अवलोकन गुन्ह्यांचा तपास सुरु केला. अखेर या पथकाच्या प्रयत्नास यश आले आणि सदरील टोळीबाबत गुप्त माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाने सापळा रचून अमोल अशोक मुंडे (रा. कोयाळ, ता. धारूर) यास अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथून तर लक्ष्मण बालाजी कराड (रा. चोपनवाडी) यास अंबाजोगाई शहरातून ताब्यात घेतले. या दोघांनी अन्य इतर साथीदारांसोबत मिळून सदरील गुन्हे केल्याची कबुली दिली असून तपासात त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या दोघांकडून चोरीची मोटारसायकल, चोरीचे मोबाईल आणि इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या टोळीतील इतर आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे व सहा. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकातील पोलीस कर्मचारी भास्कर केंद्रे, सानप, नागरगोजे आणि पवार यांनी यशस्वीपणे पार पाडली. लुटमार टोळीचा बिमोड करण्यात यश आल्याने पोलीस दलाचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.