Home » संपादकीय » अवलक्षण…

अवलक्षण…

अवलक्षण…

डोंगरचा राजा / संपादकीय

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीनंतर बहुमत मिळाले नसतानाही भाजपने सरकार स्थापन करण्याचा अट्टाहास सुरु ठेवला होता; तेव्हा एका पत्रकाराने भाजपचे राम माधव यांना प्रश्‍न विचारला होता की, तुमच्याकडे बहुमत नसताना तुम्ही सरकार कसे स्थापन करणार?’ तेव्हा राम माधव म्हणाले होते की, आमच्याकडे अमित शहा आहेत.’ पण अमित शहा यांची जादू यावेळी चालली नाही. उलट हात दाखवून अवलक्षण’ पदरी आले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा अश्‍वमेध कर्नाटकात अडवला गेला आणि मोदी यांच्या काँग्रेसमुक्त भारत’ मोहिमेला ब्रेक बसला. कर्नाटकात सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून सत्ता स्थापन करण्याचा भाजपचा अधिकार असला, तरी जेव्हा दोन क्रमांकाचा काँग्रेस आणि तीन क्रमांकाचा जेडीएस एकत्र येतात तेव्हा भाजपने लोकशाही मार्गाने बाजुला होऊन कुमारस्वामी यांना संधी द्यायला हवी होती. पण अमित शहा यांच्यासारख्या नेत्यांचा आग्रह आणि बी. एस. येडियुराप्पा यांचा दुराग्रह, यामुळे भाजप तोंडघशी पडला. फ्लोअर टेस्टला सामोरे जाण्यापूर्वीच (अडीच दिवसात) येडियुराप्प्पांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. हे सारे प्रकरण सर्वोच्च न्यायायलात गेल्यानेच हे होऊ शकले, हे मान्यच करावे लागेल. कारण
सर्वोच्च न्यायालय लगेच दुसर्‍या दिवशी बहुमत सिध्द करण्याचा आदेश देईल, असे भाजपच्या नेत्यांना वाटले नव्हते. आपल्याला घोडेबाजार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल असे त्यांना वाटले होते. ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांविरुध्द महाभियोग दाखल करण्याची नोटीस काँग्रेसने दिली होती, त्याच सर्वोच्च न्यायालयाने लोकशाहीला वाचवणारी भूमिका घेतली, हे काँग्रेसनेही लक्षात घेण्याची गरज आहे. कारण या सार्‍या प्रक्रियेत न्यायालयाचा हस्तक्षेप झाला नसता तर येडियुरप्पा यांनी 15 दिवसांच्या मुदतीत आरामात बहुमत सिध्द केले असते. भाजपने घाई केली आणि ते तोंडघशी पडले हे वास्तवच असले, तरी आता येणार्‍या काळातील राजकारणाचे वारे कोणत्या दिशेने वाहणार आहेत, याचा अंदाज सर्वांनाच घ्यावा लागणार आहे. कर्नाटकात गेली पाच वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेसच्या जागा यावेळी कमी झाल्या; आणि बहुमतापर्यत पोहोचता येणार नाही, हे लक्षात येताच त्यांनी जेडीएसला पाठिंबा देत दुय्यम भूमिका स्वीकारली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही एक चांगली राजकीय खेळी असली तरी पक्षाला मुख्यमंत्रीपद गमवावे लागले हेही वास्तव आहे.

नवीन मंत्रिमंडळात काँग्रेसचा योग्य सन्मान राखला जाईल, हे खरे असले तरी राज्यात पुन्हा एकदा कुमारस्वामी यांच्या पक्षाला वाढण्याची संधी उपलब्ध झाली आहे, हेही विसरुन चालणार नाही.गुजरातमध्ये भाजपच्या जागा कमी झाल्या तरी त्यांनी एकहाती सत्ता राखली होती. आता काँग्रेसने जागा कमी झाल्यावरही कर्नाटकातही सत्ता राखली असली तरी ही सत्ता भागीदारातील आहे. काँग्रसने अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याची रणनितीही खेळलेली नाही. काँग्रेसला जरी उपमुख्यमंत्रीपद मिळाले तरी त्यांच्याकडे दुय्यम भूमिकाच राहणार आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या नादात काँग्रेसने आणखी एक सत्ताकेंद्र तयार करुन ठेवले आहे. यामागील धोका त्यांच्या लक्षात आला असेलच. कुमारस्वामी यांना आणि त्यांच्या पक्षाला कधी स्वप्नातही वाटणार नाही अशी संधी मिळाली आहे. या संधीचे त्यांनी सोने केले नाही तरच नवल.वर्षभरात होणार्‍या लोकसभा निवडणुकीतही याचा परिणाम होणे अटळ आहे.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सत्तेच्या अट्टहासापायी तोंडघशी पडलेले भाजपचे नेते गप्प बसणार नाहीत.
कुमारस्वामी यांचे सरकार फारकाळ टिकणार नाही असे भाष्य करुन अमित शहा यांनी त्याचे सुतोवाच केले आहे. पुर्वी एकदा कुमारस्वामी आणि भाजप यांनी संयुक्तपणे सत्ता स्थापन केली होतीच. आता भाजपला फोडाफोडी करायला भरपूर वेळ मिळणार आहे. विधानसभेत भाजपची ताकद जास्त आहे. सरकारला सहजासहजी काम करु दिले जाईल असे वाटत नाही. काँग्रेस आणि जेडीएस जरी किमान समान कार्यक्रमावर एकत्र आले तरी काही मतभेद राहणारच आहेत. त्यावरच भाजपचे लक्ष असणार आहे. जेडीएसमधील काही आमदार काँग्रेससोबत जाण्यास नाखुश होते. काँग्रेसच्या काही आमदारांचीही तीच भावना आहे. या नाराजीतून येत्या काळात काही उलटसुलट घडणार नाही ना, याची दक्षता दोनही पक्षांना घ्यावी लागणार आहे. विधानसभेत अगदी काठावरचे बहुमत असल्याने सभागृहात काहीही होऊ शकते, हेही विसरता कामा नये. केवळ न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे सत्ता गमवावी लागल्याने दुखावलेला भाजप योग्य संधीची वाट पहात राहणार आहे. त्यांना ही संधी मिळणार नाही, याची काळजी तर घ्यावीच लागेल.
येत्या काही कालवाधीत देशातील आणखी काही विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत. त्यापैकी बहुतेक ठिकाणी भाजपच सत्तेवर आहे. भाजपचा दक्षिण विजय कर्नाटकात रोखला गेला असला तरी आता ते या राज्यांमध्ये अधिक सावधगिरीने आणि तयारीने उतरणार आहेत.काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात भाजपने चांगली कामगिरी केली. आता भाजपची सत्ता असलेल्या या राज्यांमध्ये चांगली कामगिरी करुन भाजपला सत्तेपासून दूर करण्याचे आव्हान काँग्रेसला पेलावे लागणार आहे. देशातील काँग्रेसशासित राज्यांची संख्या वाढवण्याची संधी काँग्रेसलाही उपलब्ध होणार आहे. सध्यातरी काँग्रेसला कर्नाटकातील सत्ता चांगल्याप्रकारे राबवतानाच राज्यातील आपला प्रभाव कायम ठेवण्याचे काम करावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.