Home » महाराष्ट्र माझा » म्हाडाच्या 3139 सदनिका व 29 भूखंडांसाठी सोडत.

म्हाडाच्या 3139 सदनिका व 29 भूखंडांसाठी सोडत.

म्हाडाच्या 3139 सदनिका व 29 भूखंडांसाठी सोडत.
डोंगरचा राजा / आँनलाईन.

पुणे – म्हाडाच्या 3139 सदनिका आणि 29 भूखंडांसाठी सोडत, कसा व कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यंमधील 3 हजार 139 सदनिका आणि 29 भूखंडांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. 19 मे पासून अर्जप्रक्रियेला सुरुवात झाली असून 30 जून रोजी संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. तीन हजार 139 सदनिका आणि 29 भूखंडांच्या विक्रीसाठी https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्जदारांच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. सर्वात जास्त सदनिका पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीत आहेत.

‘म्हाडा’च्या पुणे विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी या सदनिका आणि भूखंड आहेत. 18 जून रोजी रात्री 12 नंतर अर्जासाठी नोंदणी बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक काकडे यांनी दिली. अर्ज करण्यासाठी पुणे मंडळातर्फे यंदा प्रथमच अर्जदारांना एनइएफटी/आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. एनइएफटी/आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी 20 मे दुपारी 2 ते 19 जून रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत कालावधी असणार आहे.

अत्यल्प गटासाठी पाच हजार रुपये, अल्प गटासाठी दहा हजार, मध्यम गटासाठी 15 हजार आणि उच्च उत्पन्न गटासाठी 20 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. अनामत रक्कम ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, आरटीजीएस आणि एनईएफटी याद्वारे भरता येणार आहे. डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम 20 मे रोजी दुपारी 2 ते 20 जून रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत स्वीकारली जाणार आहे. ऑनलाइन अर्ज ‘लॉटरी डॉट म्हाडा डॉट जीओव्ही डॉट इन’या संकेतस्थळावरून स्वीकारले जाणार आहेत. नांदेडसिटी 1080, रावेत आणि पुनावळे 120, वाकड 22, चिखली 268, चऱ्होली वडमुखवाडी 214, डुडुळगाव मोशी 239, येवलेवाडी 80, कात्रज 29 आणि धानोरी 51 अशी पुण्यातील सदनिकांची संख्या आहे..

Leave a Reply

Your email address will not be published.