Home » राजकारण » हप्तेखोरीसाठी दंगल घडवली ; धनंजय मुंडेंचा आरोप.

हप्तेखोरीसाठी दंगल घडवली ; धनंजय मुंडेंचा आरोप.

हप्तेखोरीसाठी दंगल घडवली ; धनंजय मुंडे यांचा आरोप.
डोंगरचा राजा / आँनलाईन
– औरंगाबाद शहरातील दंगलग्रस्त भागाची पाहणी करताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे.
औरंगाबाद : – औरंगाबादमधील दंगल ही धार्मिक नव्हती, तर हातगाडीवाल्याकडून कोणी हप्ता घ्यायचा यावरून वाद वाढवला गेला. स्वत:च्या व्यवसायाची वृद्धी व्हावी म्हणून क्षुल्लक भांडणाला पेटविले गेले. वास्तविक अशा पद्धतीची दंगल होऊ शकते, असा अहवाल पोलिसांच्या विशेष शाखेने अडीच महिन्यांपूर्वी दिला होता. मात्र, त्याकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केले. असे करण्यामागे अनेकांचे हितसंबंध होते. माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्या एका भूखंडाकडे जायला रस्ता नव्हता, तो व्हावा असादेखील उद्देश हे भांडण पेटवण्यामागे होता, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी केले. दंगलग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पत्रकार बैठकीत ते बोलत होते.

पोलिसांनी दंगा होत असताना बघ्याची भूमिका घेतली. हातगाडीवाल्याकडून हप्ता मिळविण्यासाठी महापालिकेकडून कारवाई करावी लागली. यात शिवसेना आणि एमआयएम या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांचा सहभाग होता. खरेतर या भागात एका धर्माच्या मालकाचे दुकान होते, तर किरायेदार दुसऱ्या धर्माचा होता. त्यामुळे कोणत्याही व्यापाऱ्याला दंगल व्हावी, असे वाटत नव्हते. मात्र, दुकाने जळाली तरी बेहत्तर, जीव गेले तरी हरकत नाही अशी भूमिका घेत काही राजकीय पक्षांनी ही दंगल घडवून आणली. दंगल होईल, अशी पूर्वसूचना असतानाही गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रालयाच्या या अपयशात आपलाही वाटा आहे, असे समजून राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी मुंडे यांनी केली. दंगलीची न्यायालयीन चौकशी करावी, त्यासाठी विद्यमान न्यायाधीशाची नियुक्ती केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली. दंगलीनंतर पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या धरपकडीत निर्दोष व्यक्तींना पकडले जात आहे. चित्रफितीत दिसणारे दंगेखोर कोण आहेत, हे सर्वाना माहीत आहे. त्या सर्वावर कारवाई केली पाहिजे. तसेच मृत्युमुखी पडलेल्या दोन व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपये व जखमींना दोन लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. अडीच महिन्यांपासून पोलीस आयुक्त नाहीत. महापालिकेचे आयुक्तही नाहीत. त्यामुळे सरकारकडून होणारे दुर्लक्षही स्पष्टपणे दिसून येत आहे. दंगलीत सहभागी असणाऱ्या सर्वावर कारवाई करावी, असे सांगत मुंडे यांनी ही दंगल थांबवता येणे शक्य होते. मात्र, केवळ अनास्थेमुळे हे शक्य झाले नाही, असे सांगितले. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार सतीश चव्हाण, कदीर मौलाना, अभिजित देशमुख आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.