पाकिस्तानी ‘साखर‘!
डोंगरचा राजा /आँनलाईन.
मुंबईतील एका नामांकित उद्योगसमूहाने पाकिस्तानला चॉकलेट निर्यात केले होते. त्या बदल्यात त्यांनी चॉकलेटमधील साखरेएवढीच पाकिस्तानकडून आयात केलेली 30 हजार क्विंटल साखर नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाली आहे, असे समजते. असे असले तरीही नेमकी किती टन साखर पाकिस्तान येथून आली याविषयी आकडेवारी वेगवेगळी येत आहे. पण येथे भरमसाट साखरेचे उत्पादन झालेले असतानाही पाकिस्तानची साखर भारतात आलेली आहे, हे मात्र निश्चित. ठरावीक वस्तूंची निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात काही प्रमाणात कोणतीही वस्तू विनाशुल्क आयात करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा फायदा घेत ही साखर आयात केली आहे.
यंदा देशात 316 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. एफआरपी’प्रमाणे पैसे देण्यासाठी कारखान्यांकडे पैसे नाहीत. शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्या दबावानंतर केंद्राने निर्यात अनुदानाची घोषणा करीत आयात शुल्क वाढवले. त्यामुळे बाजारातील साखरेचे दर स्थिर होतील, अशी अपेक्षा असतानाच दुष्काळात तेरावा महिना यावा त्याप्रमाणे पाकिस्तानची साखर आयात झाली. संपूर्ण देशात वर्षभर अडीच लाख मेट्रिक टन साखर लागते. मात्र यावर्षी साखरेचे उत्पादन 3 लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक झाले आहे. मुख्य म्हणजे मागणीपेक्षा 60 ते 65 लाख टन अधिक साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात ज्या क्षेत्रात पाणी मुबलक आहे तेथे भरघोसपणे ऊस शेती केली जाते. ऊस शेती म्हटली की विशेषत: पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र क्षेत्र आठवते. याच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर येथून प्रतिदिन 2600 टन साखर रेक (रेल्वे) मधून पंजाब, पश्चिम बंगाल, गुवाहाटी आदी राज्यांत जात होती; पण गेल्या सहा महिन्यांपासून एकही रेक जाऊ शकलेली नाही. त्यामुळे व्यापा-यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे साखर उद्योग किती भीषण संकटात आहे, हे ठळकपणे लक्षात येते. या खडतर स्थितीतून सावरण्यास या क्षेत्रास काही कालावधी लागणार आहे. तो नेमका किती असू शकेल याविषयी आताच सांगणे कठीण आहे. शेती उत्पादनातील नियोजन या सूत्राकडे यावेळी लक्ष वेध होत आहे. या सूत्राचा गांभीर्याने विचार होण्याचीही आवश्यकता अधोरेखित होत आहे. यामध्ये लक्षवेधी सूत्र म्हणजे साखर आयात केलेला येथील संबंधित उद्योगसमूह आणि पाकिस्तान या दोघांचीही व्यापारविषयक आवश्यकता (आदान-प्रदान) पूर्ण झाली आहे. त्यामुळे विद्यमान बिकट स्थितीतही ही मंडळी निश्चिंत आहेत आणि इतर चिंतित आहेत. देशातील या मालाची विक्रीप्रक्रिया पूर्ण होणे अगत्याचे आहे. कारण यामध्ये पुष्कळ प्रमाणावर पैसे गुंतून राहिल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत असणार यात दुमत नाही.
यावर्षी देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. तरीही त्या आस्थापनाने भारतापेक्षा 1 रुपया स्वस्त असलेली साखर आयात करून येथील साखर उत्पादक शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे दुष्कर्म केले आहे. व्यावसायिक लाभामध्ये जराही तडजोड न करता केवळ स्वत:चा विचार करण्याचा भाग यामागे आहे, असे स्पष्टपणे कळते. दुसरे सूत्र असे की साखरेचे विक्रमी उत्पादन झालेले असले तरी साखरेच्या साठेबाजांकडे चौफेर लक्ष पाहिजेच. कारण पुष्कळ दूरचा विचार करून त्यांची पावले पडत असतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीकडे सरकारचे बारीक लक्ष हवे. साठेबाज कोण याची माहिती सरकारकडे असेलच. किंबहुना ती असायलाच पाहिजे. साठेबाज या शब्दाची व्याख्या सरकारकडे स्पष्ट असेलच, अशी आशा आहे. जे व्यापारी आणि समूह प्रामाणिकपणे कृती करतात त्यांच्याविषयी शंका घेण्याचा प्रश्नच नाही. यांचा आदर्श साठेबाज केव्हा घेणार? नेहमी मागणी असलेल्या वस्तूंची आवक घटल्यास त्या वस्तूंची किंमत पटकन वाढते. मात्र ती कमी होण्यास दीर्घकाळ लागतो. अशा कालावधीत नागरिकांचा खिसा रिकामा करून स्वत:चा भरघोस फायदा उचलणारे साठेबाज नागरिकांची पिळवणूकच करत असतात.
आयात साखरेप्रकरणी कितीही आरडाओरडा केला तरी त्याचा उपयोग नाही. सरकारही त्या आस्थापनाला जाब विचारू शकत नाही. कारण आहे सरकारचे धोरण. देशामध्ये ज्या गोष्टीचे विक्रमी उत्पादन झाले आहे. तोच माल या कालावधीत आयात करता येणार नाही, तोच माल आयात करायचा असल्यास येथील त्या मालाची विक्री झाल्यानंतर आयात करण्याची सवलत सरकार देऊ शकते. या पद्धतीचे धोरण वर्तमान प्रसंगावरून बोध घेत केंद्र सरकार तयार करेल का? अन्यथा असे चक्र चालूच राहणार आहे. धोरणातील त्रुटींकडे लक्ष देऊन त्यांत तत्काळ दुरुस्ती करून येथील शेतकरीवर्गाला दिलासा दिला पाहिजे. शेतकरी हा घटक सरकारच्या धोरणांतील त्रुटींमुळे अडचणीत येणार नाही, याकडे लक्ष असायला पाहिजे. देशातील शेतकी मालाचे उत्पादन लक्षात घेता कोणता माल मागवायचा, मागवायचा नाही हे विचारपूर्वक ठरवणे म्हणजे राष्ट्रहितैशी व्यापक विचारभावना झाली. आजमितीस ती लयाला गेली असल्याचे साखर आयातीच्या या उदाहरणावरून सुस्पष्ट झाले आहे.
पाकिस्तानला देण्यात आलेल्या मोस्ट फेवर्ड नेशन’ या सन्मानाचा त्यांनाच व्यापारी आनुषंगाने लाभ होत आहे. शत्रूला देण्यात आलेला हा सन्मान काढण्यात आल्याचे ऐकिवात, वाचनात नाही. याचाच लाभ उठवून पाकिस्तान भारताशी व्यापार करत आहे. भारताने शत्रूला मोस्ट फेवर्ड नेशन’ने सन्मानित केले. पण पाकिस्तानने मात्र भारताचा असा सन्मान केलेला नाही. तरीही नमते घेत शत्रूशी व्यापार केला जात आहे. प्रत्येकवेळी भारतच तडजोड करत असतो. यामुळेच पाकिस्तान कायम आक्रमक राहत असतो. त्यांना पदोपदी धूळ चारण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्यांना जगाच्या नकाशावरूनच नष्ट केल्याविना भारतात शांतता प्रस्थापित होणार नाही. सीमेवर कुरापती काढायच्या आणि सवलतीचा लाभ घेत व्यापारही करायचा, हे पाकिस्तानचे धोरण आहे. अशा कपटी देशाला धुळीस मिळवण्यासाठी भारत सरकारने ठोस धोरण आखण्याची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा पाकिस्तान त्याच्याच धोरणाप्रमाणे वाटचाल करत राहणार. असे असल्याने शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी भारत सरकार निर्णायक भूमिका घेणार का, याकडे देशवासीयांचे कायम लक्ष लागून राहिले आहे आणि याच प्रतीक्षेचा वैताग आला आहे.
—