फार्मसी कॉलेजांची भाऊगर्दी!
डोंगरचा राजा / आँनलाईन
राज्यात नव्या ४२ महाविद्यालयांची भर; अभियांत्रिकीप्रमाणेच प्रवेशफुगवटय़ाची भीती
राज्यभर गल्लोगल्ली सुरू झालेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांची परिस्थिती डबघाईला आल्यानंतर आता संस्थाचालकांनी औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) अभ्यासक्रमांकडे मोर्चा वळवला असून यंदा औषधनिर्माणशास्त्र पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाची ४२ नवी महाविद्यालये राज्यात सुरू होणार आहेत. त्यामुळे येत्या काळात अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या संस्थांना आलेल्या फुगवटय़ाप्रमाणे औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची परिस्थिती होणार का, असा प्रश्न उपस्थित होतो.
गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या रिक्त जागा हा शिक्षण क्षेत्रातील चर्चेचा विषय आहे. विद्यार्थिसंख्येअभावी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची शेकडो महाविद्यालये गेल्या काही वर्षांमध्ये बंद झाली. आता औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांची वाटचाल अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या वाटेवर सुरू झाल्याचे दिसत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचा औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांना मिळणारा प्रतिसाद वाढताना दिसतो आहे. गेल्या तीन वर्षांची प्रवेशाची आकडेवारी पाहता या अभ्यासक्रमांसाठी रिक्त जागांचे प्रमाण हे २० टक्क्य़ांपेक्षाही कमी दिसते आहे. त्याच वेळी आतापर्यंत सर्वाधिक विद्यार्थिपसंती असणाऱ्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या जवळपास ५० टक्के जागा रिक्त राहात आहेत. या पाश्र्वभूमीवर उभारलेल्या आलिशान शिक्षणसंकुलातील दुकानदारीने आता औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांकडे मोर्चा वळवला आहे.
प्रवेश क्षमतेचा चढता क्रम
शिक्षणसंस्थांनी मागितले की नवे महाविद्यालय असेच काहीसे धोरण आतापर्यंत अभियांत्रिकी अभ्यासक्रमांबाबत दिसत होते. आता अशाच प्रकारे औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता दरवर्षी वाढत आहे. येत्या शैक्षणिक वर्षांत (२०१८-१९) राज्यात औषधनिर्माणशास्त्र पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या ४२ नव्या महाविद्यालयांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने परवानगी दिली आहे. सध्या राज्यात १९१ पदवी अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये १४ हजार २१० प्रवेश क्षमता आहे, तर पदविका अभ्यासक्रमांच्या २७७ महाविद्यालयांत १७ हजार ३२३ प्रवेश क्षमता अशी एकूण ३१ हजार ५३३ प्रवेश क्षमता आहे. त्यामध्ये आता नव्या महाविद्यालयांमधील तब्बल ३ हजार ७०० जागांची भर पडत आहे. त्याचप्रमाणे असलेल्या वाढीव तुकडय़ा, पदवी अभ्यासक्रमाचे महाविद्यालय असताना पदविका अभ्यासक्रम किंवा पदविका असताना पदवी अभ्यासक्रम सुरू करणे यांच्या माध्यमातून ही प्रवेशक्षमता आणखी तीन ते चार हजारांनी वाढण्याची शक्यता आहे. यंदा २९० महाविद्यालयांना परवानगी मिळाली असून २४ हजार जागा वाढणार आहेत
तुलनेने नोकरीच्या संधीमध्ये मात्र फारशी वाढ दिसत नाहीत. औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या मनुष्यबळाच्या मागणीत गेल्या काही वर्षांत मोठा फरक पडलेला नाही. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने संकलित केलेल्या माहितीनुसार गेल्या दोन वर्षांत कॅम्पस मुलाखतींच्या माध्यमातून पदवी घेतलेल्या १५ टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकली. देशात २०१६-१७ मध्ये पदवी घेतलेल्या २०.०१ टक्केच विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकली, तर पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या १३.३६ टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली. गेल्या वर्षी पदवी अभ्यासक्रमाच्या १४.९६ टक्के विद्यार्थ्यांना, तर पदविका अभ्यासक्रमाच्या ७.५९ टक्के विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला.
वास्तुकला अभ्यासक्रमाची चार नवी महाविद्यालये : राज्यात वास्तुकला अभ्यासक्रमाच्या चार नव्या महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमताही साधारण ४०० जागांनी वाढणार आहे. सध्या राज्यात या अभ्यासक्रमाची १४ महाविद्यालये असून १ हजार १६७ प्रवेश क्षमता आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा फुगवटा आटोक्यात आणण्यासाठी यंदा या अभ्यासक्रमाच्या एकाही पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या नव्या महाविद्यालयाला परवानगी देण्यात आलेली नाही.