Home » माझी वडवणी » २५ प्रवाशांनी अख्खी रात्र रस्त्यावर काढली.

२५ प्रवाशांनी अख्खी रात्र रस्त्यावर काढली.

 1. २५ प्रवाशांनी अख्खी रात्र रस्त्यावर काढली.
  डोंगरचा राजा / आँनलाईन
  – शिवशाही’चे टायर फुटले.
  – ४० प्रवाशी बालंबाल बचावले !
  – प्रवाशांना सहन करावा लागतोय मनःस्ताप.
  अंबाजोगाई :- मागील आठवड्यातच केज तालुक्यातील होळ जवळ शिवशाही बसला अपघात होऊन एका शिक्षिकेचा जीव गेला होता. या घटनेमुळे शिवशाही बसच्या सुरक्षेबद्दल निर्माण झालेली शंका धूसर व्हायच्या आधीच शनिवारी मध्यरात्री पुन्हा एका भरधाव वेगातील शिवशाही बसचे टायर फुटल्याची घटना समोर आली आहे. चालकाने प्रसंगावधान राखत गाडीवर कसेबसे नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली.
  हि घटना मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास बार्शीजवळ घडली. अंबाजोगाई आगाराची शिवशाही बस (एमएच ०६ बीडब्ल्यू ०९०५) शनिवारी रात्री पुण्याकडे निघाली होती. बार्शीजवळ आली असता या वेगातील बसचे टायर अचानकच फुटले. हि बाब चालकाच्या लक्षात आल्याने त्याने प्रसंगावधान राखून हेलकावे खाणाऱ्या गाडीवर नियंत्रण मिळवून गाडी थांबविली आणि संभाव्य अनर्थ टळला. यावेळी गाडीत बालक, महिलांसह ४० प्रवाशी होते. चालकाने नंतर बार्शी आगारात संपर्क साधून मदत पाठविण्याची विनंती केली, परंतु, बार्शी आगाराकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. २५ प्रवाशांनी अख्खी रात्र रस्त्यावर काढली. तर उर्वरित कंटाळून मिळेल ते वाहन पकडून निघून गेले. अनेक विनंत्या केल्यानंतर बार्शी आगारातून सकाळच्या सुमारास एक मेकॅनिक आला, परंतु त्यालाही टायर काढता आले नाही. या कामासाठी आणखी मनुष्यबाळाची आवश्यकता असल्याचे सांगूनही बार्शी आगाराकडून वेळेवर मदत मिळाली नाही. मागील आठवड्यात याच बसचे टायर अचानक पेटले होते अशी माहितीही आता समोर आली आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे शिवशाही बसच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
  दरम्यान, मोठ्या थाटात सुरु झालेल्या आरामदायी शिवशाही बस नियोजनाअभावी प्रवाशांसाठी गैरसोयीच्या ठरत आहेत. या सर्व बसेस भाडेतत्वावर घेण्यात आल्या आहेत. त्यात चालक ठेकेदाराचा तर वाहक महामंडळाचा अशी जोडी लावण्यात आली आहे. त्यामुळे अडचणीच्या वेळी बस आगारातील कर्मचारी खाजगी चालकांना मदत करण्यास टाळाटाळ करतात. परिणामी वेळेवर मदत मिळत नसल्याचा त्रास आरामदायी प्रवासाच्या इच्छेखातर दीडपट पैसे मोजून प्रवास करणारांना होत आहे. प्रवाशांकडूनही या बसची विशेष काळजी घेतली जात नसल्याचेही चित्र आहे. अनेक गाड्यात प्रवाशांनी थुंकून घाण केली आहे, तर अनेक गाड्यातील एसी व्हेन्ट, सॉकेट तोडलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.