भुजबळांना ‘ओबीसी योद्धा’ पुरस्कार जाहीर.
डोंगरचा राजा / आँनलाईन.
न्यायालयाकडून जामीन मिळालेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना “ओबीसी योद्धा’ पुरस्काराने गौरविले जाणार आहे. 11 मे रोजी मुंबईतील आझाद मैदानात भारीप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
राज्यस्तरीय ओबीसी जातनिहाय जनगणना अभियान कृती समितीच्यावतीने ही माहिती देण्यात आली. यासंदर्भात प्रा. श्रावण देवरे यांनी म्हटले आहे की, संविधानिक न्याय यात्रांतर्गत राज्यस्तरीय ओबीसी जातनिहाय जनगणना अभियान 11 एप्रिल 2018 रोजी पुणे येथील समताभुमी-फुलेवाड्यापासून सुरू झाली आहे. 11 मे रोजी सकाळी 11 वाजता या अभियानाच्या समारोपाची जाहीर सभा आझाद मैदानावर घेण्यात येणार आहे.
आझाद मैदानावरील या समारोपाच्या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी छगन भुजबळ राहतील असा ठराव 22 एप्रिल रोजी परभणी येथील जनगणना अभियानाच्या बैठकीत एकमताने मंजूर झालेला होता. 11 मे पर्यंत भुजबळांची सुटका झाली नाही तर त्यांच्या अध्यक्षपदाची खुर्ची रिकामी ठेऊन आझाद मैदानावरील ही परीषद संपन्न करण्याचा निर्धारही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला होता.
या समारोपाच्या सभेत भुजबळांना ओबीसी योद्धा’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. परिषदेचे उद्घाटन प्रकाश आंबेडकर करतील. उत्तर प्रदेशचे गोरखपूर मतदारसंघातून नुकतेच निवडून आलेले खासदार इंजिनियर प्रविणकुमार निषाद, हरियानाचे ओबीसी खासदार राजकुमार सैनी, हुसेन दलवाई हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित रहणार आहेत.